- गोपाल लाजरकर
गडचिरोली : आधुनिक व अधिक नफ्याची शेती कसता याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना कृषी पर्यटनाचा अनुभव घेता यावा व त्यांचा विरंगुळा व्हावा, यासाठी गडचिरोली येथील मंजूषा योगेंद्र मोडक यांनी पोर्लाजवळच्या नवरगाव येथे योरमा-मायरा कृषी पर्यटन सुरू केले. जिल्हा उद्योग केंद्रातून त्यांनी कर्ज घेऊन हा व्यवसाय उभारला आहे. त्यांच्या ह्या अनोख्या पर्यटन व्यवसायाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
मंजूषा मोडक यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या मदतीने नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्याने दहा लाख रुपयांचे कर्ज प्राप्त केले. त्यानंतर कृषी पर्यटनासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी केले. नवरगाव येथे जवळपास तीन एकर शेती परिसरात आवश्यक वास्तूंची उभारणी केली.
सुरुवात असली तरी त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल १६ लाखांच्या आसपास आहे. या व्यवसायामुळे त्या एक स्वावलंबी उद्योजक बनल्या आहेत. त्यांनी पाचजणांना रोजगारही दिला आहे. कृषी पर्यटन प्रकल्प स्थानिक भागात खूप लोकप्रिय आहे. अॅग्रो टुरिझममुळे शहरी लोकांना निसर्गाशी संवाद साधता येतो.
कृषी पर्यटनात काय-काय ?
कृषी पर्यटनात स्वीमिंग पूल, नवाबाच्या वस्तूंचे म्युझियम, पेंटिंग गॅलरी, बैलबंडी सफारी, गोटफार्म आर्दीचा समावेश आहे. येथे भेट देणाऱ्यांना सदर वास्तू व बाबींविषयी माहिती दिली जाते. पाट्यावर मसाला वाटणे, धानाचे कांडण, जात्यावर दळण दळणे, विटीदांडू, लगोरी यासह विविध खेळ खेळण्याची साधनेसुद्धा येथे आहेत.
सेंद्रिय शेती, आयुर्वेदिक वनस्पतीबाबत मार्गदर्शन
नवरगाव येथील कृषी पर्यटनस्थळी भेट देणाऱ्यांना सेंद्रिय शेती, आयुर्वेदिक वनस्पती, मधमाशीपालन, आयुर्वेदिक औषधीबाबतही मार्गदर्शन केले जाते.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून मिळालेले अनुदान आणि बँकांकडून मिळालेले कर्ज यामुळे या व्यवसायाला चालना मिळाली. महिलांनी आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार किंवा लघुउद्योग उभारावा.
- मंजूषा योगेंद्र मोडक, प्रकल्प संचालिका
Tractor Scheme : महिलांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदी करता येणार, काय आहे ही योजना जाणून घ्या