Join us

Flower Farming : जळगावच्या शेतकऱ्याची 25 गुंठ्यातील फुलशेती मका, ज्वारीला भारी, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 20:44 IST

Flower Farming : फुलांची शेती (Ful Sheti) फुलवून वर्षाला दीड ते दोन लाखांचे उत्पन्न भडगाव टोणगाव येथील इंदल परदेशी या शेतकऱ्याला मिळत आहे.

- अशोक परदेशी 

जळगाव : कपाशी, मका, ज्वारी या पारंपरिक पिकांसोबतच २५ गुंठे जमिनीत दरवर्षी झेंडू, नवरंग, बिजली आदी फुलांची शेती (Flower Farming) फुलवून वर्षाला दीड ते दोन लाखांचे उत्पन्न भडगाव (Jalgaon District) टोणगाव येथील इंदल परदेशी या शेतकऱ्याला मिळत आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला आहे.

परदेशी हे गेल्या ५ वर्षापासून इतर पिकांसोबतच फुलशेतीकडे वळले आहेत. आजही शेतात नवरंग, बिजली आदी फुलांची आकर्षक शेती फुलली आहे. या फुलांच्या उत्पन्नाचा पैसा दररोज हाती पडत आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लागत आहे. फुलशेतीचा आधार मिळत असल्याचे इंदल परदेशी यांनी सांगितले.

परदेशी यांच्याकडे अडीच एकर जमीन आहे. पूर्वीपासून ते कपाशी, मका, ज्वारी आदी पारंपरिक पिकांची शेती करायचे. मात्र, कधी निसर्गाचा फटका, कधी पिकांना चांगला भाव तर कधी कमी भाव मिळायचा. या शेतपिकांना ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे उसनवारीने वा व्याजाने पैसे काढून मुलांच्या शिक्षणासह शेती पिकावर खर्च करावा लागत होता.

रात्रंदिवस कष्ट करूनही फारसे यश मिळायचे नाही. त्यांनी सन २०१९ पासून अडीच एकर क्षेत्रापैकी फक्त २५ गुंठे जमिनीत झेंडू, शेवंती, बिजली, नवरंग आदी फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांना चांगला पैसा मिळत आहे.

कपाशी, मका, ज्वारी ही पारंपरिक पिके घेण्यासोबतच २५ गुंठे क्षेत्रात विविध फुलांची लागवड करीत आहे. ५ वर्षांपासून फुलशेतीतून दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळत आहे. याला खर्च ४० ते ५० हजार येतो. फुलशेतीच्या उत्पन्नाने रोज पैसे हाती येतात. यातून मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवला जातो.- इंदल परदेशी, फूल उत्पादक, टोणगाव

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी यशोगाथाफुलंकृषी योजनाजळगाव