Join us

Success Story : निफाडचा शेतकरी विना मशागत तंत्राने द्राक्ष शेती का करतोय, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 5:32 PM

विना नांगरणी तंत्राच्या बळावर निफाड तालुक्यातील शेतकरी बबन बोडके यांनी द्राक्ष शेती यशस्वी केली आहे.

शेतीत नवनवे प्रयोग केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे चित्र सभोवताली दिसू लागले आहे. हरेक शेतकरी आपल्या शेतकरी वेगळा प्रयोग करू पाहात आहेत. त्यामुळे यात कधी यश तर कधी अपयशही येत आहेत. मात्र वाढत्या महागाईवर मत करण्यासाठी, कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी आधुनिक शेतीला कल्पकतेची जोड देऊन यशस्वी शेती करत आहेत. असाच काहीसा आगळा वेगळा प्रयोग निफाड तालुक्यातील शेतकऱ्याने अमलात आणत द्राक्ष शेती फुलवली आहे. 

नाशिक जिल्हा मुळातच द्राक्ष पंढरी म्ह्णून ओळखला जातो. जिल्हाभरात द्राक्षाची नवनव्या वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र सद्यस्थितीत द्राक्षावरील खर्च आवाक्याच्या बाहेर गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. याच समस्येवर उपाय म्हणून गेल्या सात वर्षांपासून विना नांगरणी तंत्रज्ञान व पीक अवशेषांचा वापर या बळावर निफाड तालुक्यातील सावळी येथील शेतकरी बबन बोडके यांनी द्राक्षांची शेती यशस्वी केली आहे. या तंत्राच्या साहाय्याने जमीनीची हालचाल न करता सर्व तण जमीनीत जिरवतात, तसेच शेणखताचा वापर न करता निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतात. यामुळे बोडके यांचा अतिरिक्त खर्च कमी झाला असून शिवाय जमिनीची जलधारणक्षमता वाढवली आहे. 

बबन बोडके हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करत आहेत. आई वडील शेतीत असल्याने बोडके यांनी देखील शेतीत पाय रोवून उभे राहत पारंपरिक शेतीला सोबत घेत नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत शेती फुलविण्याचा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष शेती होत असल्याने द्राक्ष शेतीसाठी नवा प्रयोग करण्याच्या उद्देशाने आणि वाढलेला खर्च कमी करण्याचा उद्देशाने विना मशागत तंत्र समजून घेण्यास सुरवात केली. यासाठी कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर याच्याशी संपर्क केला. चिपळूणकर यांची विना मशागत शेती समजून घेतली. द्राक्ष शेतीतही असं काही होऊ शकतं, याचा प्रत्यय आला. त्यानुसार तीन एकर द्राक्ष शेतीत विना नांगरणी तंत्र अंमलात आणले. आज बोडके यांची दीड एकर द्राक्ष बाग एक्स्पोर्टसाठी तयार झाली असून आजपासून द्राक्ष काढणीला प्रारंभही झाला आहे. 

बबन बोडके म्हणाले म्हणाले की, नववी पासून पारंपरिक शेती करत आलो आहोत, उसाचे शेत अधिक असायचे, त्यानंतर हळूहळू द्राक्षांकडे वळालो. गेल्या सात वर्षांपासून हे विना मशागत तंत्र वापरत आहे. सुरवातीला काळजी वाटत होती, मात्र हळूहळू परिणाम दिसून येऊ लागला. या पद्धतीत शेतीत वाढलेल्या तणावर तणनाशक मारून ते त्याच पिकात कुजवले जाते. आणि तेच कुजवलेले तण शेणखताचे काम करत असते. यामुळे खर्च कमी झाल्याचे बोडके यांनी सांगितले. आता हळूहळू आजूबाजूचे शेतकरी देखील या पद्धतीने द्राक्ष शेतीसाठी तयार झाले आहेत. इतर द्राक्ष उत्पादक शेतकरी आपल्या द्राक्ष बागेत दर एक दोन वर्षांनी शेणखत टाकत असतात. मात्र या पद्धतीमुळे शेणखत टाकण्याचा कालावधी वाढत जाऊन खर्च कमी होतो. यंदा याच द्राक्ष बागेतून जवळपास आठ ते दहा टन द्राक्षे एक्स्पोर्ट केली जात आहेत. तर दोन ते तीन टन माल लोकल मार्केटला विक्री केला जाणार असल्याचे बोडके यांनी सांगितले. 

काय आहे विना मशागत तंत्र 

या पद्धतीत विना नांगरणीची शेती केली जाते. म्हणजेच ज्या शेतात पिकाची लागवड करण्यात आली आहे. अशा ठिकाणी वाढत असलेले तण काढून न टाकता त्याची वाढ होऊ देणे. त्यानंतर त्यावर तणनाशक मारून ते त्याच पिकात कुजवणे. तिथेच सडू देणे याला विना मशागत शेती म्हणून संबोधिले जाते. यामुळे त्या ठिकाणच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढत असल्याचे शेती तज्ञ सांगतात. यामुळे पिकांच्या उत्पादकतेत वाढही होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय शेतकऱ्याचा खर्चही वाचतो...  

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीनिफाडनाशिकद्राक्षेलागवड, मशागत