- युवराज गोमासे
भंडारा : 'मनात जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल, तर यश दूर नाही' ही उक्ती प्रत्यक्षात साकार केली आहे, पालोरा येथील राजू फुलचंद भोयर यांनी. केवळ १२ वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या तरुणाने बेरोजगारीवर मात करीत उद्यान व्यवसायातून लाखोंची उलाढाल करणारा उद्योग उभा केला आहे.
आज त्यांच्या नर्सरीतून दररोज पाच गावांतील २० मजुरांना रोजगार मिळत असून, त्यांची यशोगाथा परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राजू भोयर यांचा प्रारंभीचा काळ अत्यंत खडतर राहिला. मजुरीच्या शोधात त्यांनी नागपूर गाठले आणि तेथे उद्यान कामाचा अनुभव घेतला. 'मजुरीपेक्षा स्वावलंबन श्रेष्ठ' या विचाराने त्यांनी भंडारा येथे फळ व फुलझाडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. २०१४ साली त्यांनी पालोऱ्यातील दीड एकर शेतीत स्वतःची नर्सरी सुरू केली.
सात एकरात २५ लाख झाडांची नर्सरी
दहा वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीतून राजू भोयर यांनी नर्सरी सात एकरांवर विस्तारली आहे. ते २५ लाख फळ व फुलझाडांची लागवड करतात. त्यांची उत्पादने विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांत विक्रीस जातात. त्यांच्या नर्सरीत विविध प्रकारच्या इनडोअर आणि आउटडोअर झाडांची तसेच फुलझाडांची लागवड केली जाते.
सजावटींच्या झाडांची लागवड अधिक
नर्सरीत ॲग्लेनिया, ॲन्थेरियम, मनी प्लॉट, आर. के. पाम, बेंझोडीया आणि डीजी प्लॉट या इनडोअर सजावटी झाडांची लागवड केली जाते. घरांच्या सजावटीसाठी ही झाडे लोकप्रिय ठरत आहेत.
फळझाडांची लागवड
संकरित आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, पपई, ॲपल बोर, अनार, पेरू, सीताफळ, चेरी आणि इतर अनेक फळझाडे नर्सरीत तयार होत आहेत.
उद्यान झाडे व आउटडोअर झाडांना पसंती
क्रोटॉन, विद्या, जुनीफर, ड्रेसिना, सायकस, गोल्डन सायप्रस, कॅकटस इत्यादी आउटडोअर झाडांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. त्याचप्रमाणे उद्यानांसाठी रॉयल पाम, एरिक पाम, डायमंड लॉन, सिलेक्शन लॉन यांची लागवड केली जात आहे.
फुलझाडांचे वैविध्य
राजू भोयर यांच्या नर्सरीत ५० प्रजातींची फुलझाडे लावली जातात. त्यात २० प्रकारचे गुलाब, १५ प्रकारचे जास्वंद तसेच जाई, जुई, चमेली, मोगरा, निशिगंधा, चाफा, लिली आणि मधुमालती या फुलझाडांचा समावेश आहे. झाडांचे संगोपन ग्रीनशेडच्या माध्यमातून काळजीपूर्वक केले जाते.
व्यवसायातील आर्थिक यश
नर्सरीच्या व्यवसायातून दरवर्षी ४८ ते ५० लाख रुपयांची उलाढाल होत असून, मजुरांचे वेतन, खत, कीटकनाशके, औषधी आणि व्यवस्थापन खर्च वगळता सुमारे ८ ते ९ लाख रुपयांचा शुद्ध नफा मिळतो आहे.
