मारोती चिलपिपरे
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पानशेवडी या छोट्याशा गावात अल्पभूधारक शेतकरी किशनराव मंगनाळे यांनी आपल्या जिद्द, नियोजन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीत नवे यश मिळवले आहे.(Farmer Success Story)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) या योजनेचा प्रभावी वापर करून त्यांनी केशर आंब्याची बाग विकसित केली आणि अवघ्या तीन वर्षांत तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.(Farmer Success Story)
सुरुवात झाली नियोजनातून
किशनराव मंगनाळे यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या मर्यादित शेती क्षेत्रात बागायती शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक बाय एक मीटर आकाराचे खड्डे तयार करून त्यामध्ये माती, शेणखत आणि रासायनिक खतांचे संतुलित मिश्रण वापरले.
चांगल्या दर्जाच्या रोपांची निवड करण्यासाठी त्यांनी मंठा येथील चंद्रकला नर्सरीतून केशर आंब्याची रोपे आणली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
बागेच्या सिंचनासाठी त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला, ज्यामुळे पाण्याची बचत तर झालीच, पण झाडांची वाढही चांगली झाली. सेंद्रिय व जैविक खतांचा योग्य वापर, वेळेवर छाटणी, तण नियंत्रण आणि कीड-रोग व्यवस्थापनामुळे झाडे निरोगी राहिली. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.
मेहनतीला मिळाले गोड फळ
सुमारे ६०० केशर आंब्याची झाडे असलेल्या या बागेत तिसऱ्याच वर्षी भरघोस फळधारणा झाली. केशर आंब्याची उत्कृष्ट चव, आकर्षक रंग आणि आकारामुळे बाजारात मोठी मागणी असल्याने संपूर्ण बाग त्यांनी ५ लाख ५० हजार रुपयांना विक्री केली.
कुटुंबाचा भक्कम पाठिंबा
या यशामागे किशनराव यांच्या वडील उद्धवराव मंगनाळे आणि पत्नी मिराबाई मंगनाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कुटुंबाच्या एकजुटीने आणि सातत्यपूर्ण मेहनतीने त्यांनी हे यश मिळवले.
कृषी विभागाचे मार्गदर्शन ठरले महत्त्वाचे
मी जुलै २०२४ मध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार मनरेगातून केशर आंबा लागवड केली. पानशेवडीचे सहाय्यक कृषी अधिकारी संभाजी वडजे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे बागेचे योग्य व्यवस्थापन करता आले.- किशनराव मंगनाळे, शेतकरी
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा
शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शाश्वत उत्पन्न मिळवणे शक्य आहे.- संभाजी वडजे, सहाय्यक कृषी अधिकारी
किशनराव मंगनाळे यांची ही यशोगाथा दाखवून देते की, योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सरकारी योजनांचा लाभ घेतल्यास अल्पभूधारक शेतकरीही बागायती शेतीतून मोठे उत्पन्न मिळवू शकतो.
'मनरेगा'सारख्या योजनेचा प्रभावी वापर करून त्यांनी केवळ स्वतःची आर्थिक स्थिती सुधारली नाही, तर इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी मार्ग तयार केला आहे.
अधिक वाचा : Farmer Success Story : 'देशी' शेतकरी, 'इंटरनॅशनल' ओळख; ऑक्सफर्डमध्ये सांगणार यशाचा मंत्र
Web Summary : Kisanrao Mangnale, a small farmer, achieved success by cultivating Kesar mangoes using MGNREGA. He earned ₹5.5 lakhs in three years through modern techniques like drip irrigation and organic fertilizers, becoming an inspiration to other farmers.
Web Summary : किसान किशनराव मंगनाळे ने मनरेगा का उपयोग करके केसर आम की खेती से सफलता प्राप्त की। उन्होंने तीन वर्षों में ₹5.5 लाख कमाए, जिससे वे अन्य किसानों के लिए प्रेरणा बन गए।