रूपेश उत्तरवार
शेतकरी आत्महत्यांमुळे राज्यातील अनेक कुटुंबांवर नैराश्याचे सावट आहे. अशा परिस्थितीतही काही तरुणांनी हार न मानता नव्या उमेदीने शेतीत पाऊल टाकले आहे.(Farmer Success Story)
त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण प्रयोगांद्वारे शेती व्यवसायात नवा आदर्श निर्माण केला आहे. अशाच यशस्वी शेतकरी पुत्रांपैकी एक म्हणजे दारव्हा तालुक्यातील खोपडी गावचा राम आनंदराव जिरे. (Farmer Success Story)
आत्महत्याग्रस्त कुटुंबाची कहाणी
२०१२ मध्ये नैसर्गिक आपत्ती व कर्जबाजारीपणामुळे रामचे वडील आनंदराव जिरे यांनी आत्महत्या केली. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. गावातील अनेकांनी रामला शेती सोडून इतर व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याने हार मानली नाही. शेती हाच माझा मार्ग या निर्धाराने तो शेतात राबू लागला.
परंपरागत शेतीपासून नावीन्याच्या दिशेने
सुरुवातीला रामने परंपरागत शेती करून चार-पाच वर्षे पिके घेतली. पण उत्पन्न समाधानकारक नव्हते. यानंतर त्याने यूट्यूब व अन्य माध्यमांतून नाविन्यपूर्ण शेतीचे प्रयोग शोधायला सुरुवात केली.
कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा आणि नैसर्गिक संकटांना तोंड देणारा पर्याय म्हणून त्याने रेशीम शेती निवडली.
रेशीम शेतीने बदलली दिशा
जिल्हा रेशीम कार्यालयाच्या मार्गदर्शनाने व रोजगार हमी योजनेच्या (रोहयो) अनुदानातून रामने एक एकर क्षेत्रावर रेशीम शेतीचा प्रयोग सुरू केला. पहिल्याच बॅचमध्ये चांगले उत्पन्न मिळाल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला. आज तो चार एकरांवर रेशीम शेती करत असून वर्षभरात चार बॅच घेतो.
उत्पन्न : एकरी सुमारे १.५ लाख रुपये
स्थिती : जिल्ह्यातील आघाडीचा रेशीम उत्पादक
या यशामुळे जिल्हा रेशीम कार्यालयानेही त्याची दखल घेतली आहे.
नैसर्गिक हळदीचा यशस्वी प्रयोग
रेशीम शेतीसोबत रामने शेतात सेंद्रिय हळदीची शेती सुरू केली. विषमुक्त हळद हा त्याचा नवा प्रयोग ग्राहकांपर्यंत पोहोचत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेतकरी आत्महत्या झाली म्हणून कुटुंबातील इतरांनी हार मानू नये. परिस्थितीला धैर्याने सामोरे गेल्यास नक्की यश मिळते. नव्या प्रयोगांमुळे शेतीत उत्पन्नाचे वेगळे मार्ग शोधता येतात.- राम जिरे, शेतकरी
दारव्हा तालुक्यातील खोपडी गावातील राम जिरे यांची कहाणी ही दुःखातून उभारी घेणारी आणि संधी शोधणारी यशोगाथा आहे. आत्महत्येच्या छायेतून सावरत त्यांनी केवळ स्वतःसाठीच नव्हे तर गावातील इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.