गोविंद शिंदे
सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत वेळ घालवण्याऐवजी, दहीकळंबा गावातील शरद शिंदे यांनी शेतीत भविष्य पाहिलं. बी.एड आणि डी.एड केल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि केवळ ५० हजार खर्चून ५ लाखांचे उत्पन्न मिळवलं. कसे ते जाणून घ्या सविस्तर (Farmer Success Story)
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील दहीकळंबा गावचा तरुण शरद शिवाजी शिंदे याने बी.एड. व डी.एड.सारखी उच्च शिक्षण पदवी घेतली. स्पर्धा परीक्षा दिल्या, सीईटी परीक्षा उत्तीर्ण केली... पण सरकारी नोकरी काही मिळाली नाही. अनेक वर्षं वाट पाहिली, वेळ खर्ची घातला, तरीही हाती काही लागलं नाही.(Farmer Success Story)
काही काळ खासगी नोकरी करायचा विचार आला, पण त्यासाठी मोठ्या रकमेची गुंतवणूक आणि कमी उत्पन्न… हे समीकरण अजिबात रुचले नाही. अखेर शरदने एक ठाम निर्णय घेतला "शेतीकडे वळायचं!" (Farmer Success Story)
पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीचा मार्ग
शरद यांच्या वडिलांची पारंपरिक शेती होती. मात्र, त्यातून फारसा फायदा होत नव्हता. म्हणून शरदने शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचं ठरवलं. त्यांनी भेंडी, दोडका, मिरची आणि टोमॅटो यासारख्या भाजीपाला पिकांची निवड केली.
आधुनिक तंत्रांचा केला वापर
* मल्चिंग पेपरने मातीचे तापमान नियंत्रित ठेवले
* ठिबक सिंचन प्रणालीमुळे पाण्याचा अचूक आणि बचतीचा वापर
* बांबूच्या काट्यांनी पीक आधार दिला
* सेंद्रिय शेणखताचा वापर करून उत्पादनात गुणवत्ता टिकवली
५० हजारांतून ५ लाखांचं उत्पन्न
शरद यांनी सुरुवातीला फक्त ५० हजार रुपये खर्च करून भाजीपाल्याची लागवड केली. तीन महिन्यांतच त्यांनी जवळपास ५ लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं. त्यांचे भाजीपाला उत्पादन कंधार, नायगाव, नांदेड इथल्या व्यापाऱ्यांनी थेट फोनवरून बुक केलं. दररोज त्यांना माल विक्रीसाठी फोन यायला लागले.
कुटुंबाचं पाठबळ आणि सामूहिक श्रम
शरदच्या यशात त्यांच्या कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. आई-वडील, भावंडं सगळ्यांनी मिळून काम केलं. एकत्र श्रम, योग्य नियोजन, आणि आधुनिक विचारसरणी यामुळे शेती आता त्यांचं मजबूत भविष्य बनली आहे.
सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रेरणास्थान
फक्त नोकरीच्या मागे लागून आयुष्य घालवू नका. शेतीतही भरपूर संधी आहेत, फक्त पाहण्याची दृष्टी हवी. आणि आधुनिक तंत्राचा वापर केला तर शेती नेहमी फायदेशीर ठरते. - शरद शिवाजी शिंदे, शेतकरी