Farmer Success Story : अलीकडच्या शेतीत नवनवे बदल करत शेतकरी कमी कालावधीत किंवा एकाच जमिनीत आंतरपिके किंवा मिश्र शेती (Mixed Farming) करण्याला प्राधान्य देत आहेत. यातून अधिकचे उत्पादन मिळतेच, शिवाय जमिनीचा पोतही खालावत नाही. असाच काहीसा भन्नाट प्रयोग छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील शिवराई या रागावतील खंडेराव कुंजर या शेतकऱ्याने यशस्वी करून दाखवला आहे. शिवाय ५८ वर्षांत एवढं उत्पादन पाहिलं नसल्याचे या शेतकऱ्याने आवर्जूनही सांगितले.
छत्रपती संभाजीनगर शहरालगत वाळूज एमआयडीसी लागून असलेले शिवराई हे खंडेराव कुंजर Khanderao Kunjar) यांचे गाव. या गावात कुंजर बंधूंचे एकत्रित कुटुंब वास्तव्यास आहे. जवळपास कुंजर कुटुंबियांना एकूण क्षेत्र 36 एकर असून यात ऊस हेच प्रमुख पिक जवळजवळ 18 एकर आहे. गेल्या खरीप हंगामात म्हणजे 2023 वर्षात 10 एकरवर तूर गोदावरी वाणाची लागवड केली होती यातून त्यांना 80 क्विंटल उत्पादन मिळाले.
दरम्यान यंदा चालू खरिपात 14 एकर क्षेत्रात तूर अधिक सोयाबीन (Intercropping Soyabean In Tur Crop) असा आंतरपीक पद्धतीचा प्रयोग करण्यात आला. तूर पिकासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संशोधित गोदावरी वाणाची निवड केली तर सोयाबीनसाठी ग्रीन गोल्ड 3344 या वाणाचे बीजोत्पादन घेतले. तर जवळपास 14 एकरावर लागवड करण्यात आली होती. तर सोयाबीन एकरी (Soyabean Farming) दहा क्विंटल मिळाले, तर तूर आठ क्विंटल मिळाली. विशेष म्हणजे सोयाबीन बीजोत्पादन असल्याने प्रती क्विंटल 4700 रुपये दर मिळाला. तर तूर अद्याप विक्री केली नसल्याचे कुंजर यांनी सांगितले.
लागवड व्यवस्थापन...
मागील दोन वर्षांपासून कुंजर आंतरपिकांचा प्रयोग करीत आहेत. यासाठी त्यांनी साडे सात फुटाचे यंत्राच्या साहाय्याने पेरणी केली. आठ दहा इंच अंतरावर पेरणी यंत्राचे पाच फणे ठेवायचे, मधल्या फंणात तूर पेरायची, उरलेल्या फंणात सोयाबीन पेरायचे. एकरी सोयाबीनचे बियाणे 25 किलो, तर तुरीचे बियाणे 2 किलो पेरण्यात आले. यासाठी 3 हजार 500 रुपयांचे दोन्ही पिकांचे बियाणे, पेरणीसाठी 1 हजार, खत 2000 रुपये, औषधे, मजुरी एकरी 3 हजार असा एकूण आतापर्यंत एकरी 20 हजार रुपये आल्याचे ते म्हणाले.
वडिलोपार्जित शेती करतो आहे. माझे वय 58 वर्ष आहे, पण इतके उत्पादन कधीच मिळाले नाही. जवळपास 14 एकरात 140 क्विंटल सोयाबीन झाले तर तूर 102 क्विंटल मिळाली. आमचे एकत्रित सर्व कुटुंब या उत्पादनाने आनंदी झाले आहे, शिवाय हा आंतरपिकाचा प्रयोगही सहज केला, पण चांगलं उत्पादन देऊन गेला. यापुढे अधिकाधिक तूर पीक घेणार असून उसापेक्षा हे पीक भारी आहे.
- खंडेराव कूंजर, शेतकरी, शिवराई, छत्रपती संभाजीनगर