Join us
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Success Story : मशरूममधून उभा केला अनोखा व्यवसाय; स्नेहलताताईंची यशोगाथा वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:08 IST

Farmer Success Story : वर्धा जिल्ह्यातील चिंचाळा येथील स्नेहलता सावरकर यांनी मशरूम उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीची नवी वाट निर्माण केली आहे. दोन एकर शेतीतून मर्यादित उत्पन्न मिळत असताना त्यांनी मशरूम शेतीचा पर्याय निवडला आणि आज त्या १२ ग्रामीण महिलांना रोजगार देणाऱ्या यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत. मशरूमपासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करून त्यांनी ग्रामीण महिलांसमोर स्वावलंबनाचा आदर्श उभा केला आहे.(Farmer Success Story)

Farmer Success Story : जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील महिलाही उद्योग क्षेत्रात मोठे यश मिळवू शकतात, हे चिंचाळा येथील स्नेहलता मनोज सावरकर यांनी सिद्ध करून दाखवले आहे. (Farmer Success Story)

स्वयंसहायता महिला बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी मशरूम उत्पादन आणि प्रक्रिया उद्योग उभारून केवळ स्वतः ची आर्थिक प्रगती साधली नाही, तर इतर ग्रामीण महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.(Farmer Success Story)

वर्धा तालुक्यातील चिंचाळा गावातील रहिवासी असलेल्या स्नेहलता सावरकर या उन्नती लोकसंचालित साधन केंद्रांतर्गत कार्यरत 'संबोधी स्वयं सहाय्यता महिला बचतगटा'च्या सक्रिय सदस्य आहेत.

ग्रामीण भागातील मर्यादित साधनसामग्री आणि आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी मशरूम उद्योगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दोन एकर शेतीतून मर्यादित उत्पन्न

स्नेहलता सावरकर यांच्याकडे सुमारे दोन एकर शेती आहे. पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न मर्यादित असल्याने कुटुंबाचा आर्थिक भार वाढत होता.

वाढत्या खर्चामुळे पर्यायी व्यवसायाची गरज निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी काहीतरी वेगळे आणि कमी जागेत अधिक उत्पन्न देणारे उत्पादन सुरू करण्याचा विचार केला.

याच काळात लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून त्यांना मशरूम शेतीबाबत माहिती मिळाली. त्यांनी कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे मशरूम उत्पादनाचे विशेष प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर त्यांनी लहान प्रमाणात मशरूम लागवडीला सुरुवात केली.

सुरुवातीला अडचणींचा सामना

मशरूम उत्पादन हा नियंत्रित वातावरणात चालणारा व्यवसाय असल्याने सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

तापमान नियंत्रण, आर्द्रता, उत्पादन टिकवणे, बाजारपेठ शोधणे अशा विविध आव्हानांमुळे व्यवसाय टिकवणे कठीण झाले होते. मात्र, त्यांनी हार न मानता सातत्य ठेवले.

कुटुंबीयांच्या सहकार्याने आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी व्यवसायात सुधारणा सुरू ठेवल्या. पुढे तेजस्विनी योजनेअंतर्गत त्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले. या निधीतून त्यांनी डार्क रूम, उत्पादन कक्ष, मशरूम बेड्स आणि प्रक्रिया युनिट उभारले.

दोन हजार बेड्सवर मशरूम उत्पादन

सध्या स्नेहलता सावरकर या नियंत्रित वातावरणात सुमारे दोन हजार बेड्सवर मशरूम उत्पादन घेत आहेत. त्या ५० दिवसांच्या चक्रात तीन वेळा उत्पादन घेतात.

दररोज सुमारे पाच किलो मशरूम उत्पादन होत असून स्थानिक बाजारपेठेत त्याला चांगली मागणी आहे.

केवळ ताजे मशरूम विक्रीवर न थांबता त्यांनी उत्पादनाचे मूल्यवर्धन करण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला अधिक गती मिळाली आणि उत्पन्नात मोठी वाढ झाली.

मशरूमपासून विविध मूल्यवर्धित उत्पादने

स्नेहलता सावरकर यांनी मशरूमपासून अनेक प्रकारची प्रक्रिया उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली.

त्यामध्ये ताजे मशरूम, वाळवलेले मशरूम, मशरूम पावडर, चटणी आणि मसाला, मशरूम पापड, वडी, बिस्कीट आणि नानखटाई, लोणचे आणि मुरंबा, फेसपॅक, चटपटीत खाद्यपदार्थ तयार केले जातात.

याशिवाय मशरूम उत्पादनातून निर्माण होणाऱ्या अवशेषांपासून गांडूळ खत आणि वर्मी वॉशची निर्मितीही त्या करतात. या मूल्यवर्धित उत्पादनांमुळे त्यांना अधिक किंमत आणि स्थिर बाजारपेठ मिळाली आहे.

१२ महिलांना रोजगार

स्वतःचा व्यवसाय उभारताना स्नेहलता सावरकर यांनी ग्रामीण भागातील इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या उद्योगात सध्या सुमारे १२ महिलांना नियमित रोजगार मिळत असून, त्या महिलाही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत आहेत.

महिला बचतगटाच्या माध्यमातून सुरू झालेला हा छोटासा प्रवास आता अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

विविध पुरस्कारांनी गौरव

मशरूम उद्योगातील यशस्वी कामगिरी आणि ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनविण्यातील योगदानाबद्दल स्नेहलता सावरकर यांचा विविध स्तरांवर सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या यशोगाथेमुळे ग्रामीण महिलांमध्ये उद्योग उभारणीची नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण

आज शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून मशरूम उद्योगाकडे पाहिले जात आहे. कमी जागा, कमी पाणी आणि कमी गुंतवणुकीत अधिक उत्पन्न देणारा हा व्यवसाय ग्रामीण भागासाठी फायदेशीर ठरत आहे. स्नेहलता सावरकर यांनी जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर हा उद्योग यशस्वी करून दाखवत महिला उद्योजकताचा आदर्श निर्माण केला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : माळरानातून लाखोंची कमाई;'ही' शेतीची स्मार्ट आयडिया वाचा सविस्तर

अधिक वाचा : Bio-Prom Project Success : महिलांची ताकद! शेतीतून उभारला १.२७ कोटींचा प्रकल्प वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Mushroom Farming Success: Woman Empowers Rural India with Unique Business

Web Summary : Snehalata Savarkar's mushroom business empowers rural women in Chinchala. Overcoming challenges, she cultivates mushrooms and creates value-added products, employing 12 women and inspiring entrepreneurship. Her success proves rural women can achieve economic independence through innovative farming.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती