Join us
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Success Story : २० किलो बियाणं… ८५ क्विंटल उत्पादन; कसं शक्य झालं? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:49 IST

Farmer Success Story : रासायनिक खतांचा वापर कमी करूनही विक्रमी गव्हाचे उत्पादन घेता येते, हे धारूरमधील एका प्रयोगाने सिद्ध केले आहे. चार एकरात तब्बल ८५ क्विंटलपेक्षा जास्त गहू आणि तीन लाखांच्या घरात जाणारे उत्पन्न… अर्जुन टोम्पे यांच्या मेहनतीने परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. नैसर्गिक उपाययोजनांवर आधारित हा प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.(Farmer Success Story)

अनिल महाजन

धारूर तालुक्यातील सटवाई मळा परिसरात एक प्रेरणादायी शेती प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. (Farmer Success Story)

सेवानिवृत्त ग्रंथपाल विजयकुमार देशपांडे यांच्या चार एकर शेतात, अर्जुन टोम्पे यांच्या अथक परिश्रमातून नैसर्गिक उपाययोजना आणि कमी रासायनिक खताच्या वापरावर आधारलेले विक्रमी गव्हाचे उत्पादन उभे राहत आहे.

तब्बल ८५ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या उत्पादनाची बाजारमूल्ये तीन लाख रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक शेतीकडे झुकाव

यंदा चार एकर क्षेत्रात २० किलो 'मुकुट'जातीच्या गव्हाची पेरणी करण्यात आली. सुरुवातीपासूनच रासायनिक खतांचा वापर मर्यादित ठेवत शेणखत, पारंपरिक उपाययोजना आणि सततची निगा या तत्त्वांवर शेती केली गेली.

अर्जुन टोम्पे यांनी पिकावर रोगराई येऊ नये यासाठी सातत्याने लक्ष ठेवले. वेळोवेळी मशागत, पाण्याचे योग्य नियोजन आणि तणनियंत्रण यामुळे आज गहू पाच ते साडेपाच फूट उंच बहरलेला दिसत आहे.

मेहनतीला यशाची जोड

आमच्या शेतात पूर्ण वेळ काम करणारे अर्जुन टोम्पे यांनी गतवर्षीही चांगले उत्पादन घेतले होते. यंदा त्यांनी नैसर्गिक उपाययोजनांचा अधिक प्रभावी वापर केला असून गहू उत्तम बहरला आहे.- विजयकुमार देशपांडे, शेतकरी

टोम्पे यांची पद्धत आहे तरी काय?

* रासायनिक खतांचा कमी वापर

* शेणखताचा योग्य प्रमाणात वापर

* रोगप्रतिबंधक उपायांची वेळेवर अंमलबजावणी

* सातत्याने शेतात उपस्थिती आणि निरीक्षण

परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान

धारूर परिसरातील शेतकरी या गव्हाच्या पिकाला पाहण्यासाठी विशेष भेट देत आहेत. नवतरुण शेतकऱ्यांनी हा प्रयोग प्रत्यक्ष पाहून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन बाबुराव शिनगारे गुरुजी यांनी केले आहे.

नैसर्गिक उपाययोजना आणि सातत्यपूर्ण मेहनत असेल तर कमी खर्चातही विक्रमी उत्पादन घेता येते. - बाबुराव शिनगारे, गुरुजी

कमी खर्चात जास्त नफा

साधारणपणे वाढत्या खतदरांमुळे शेतीचा खर्च वाढतो. मात्र या प्रयोगात खतांचा खर्च कमी ठेवून उत्पादन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे निव्वळ नफ्यातही वाढ होणार आहे.

८५ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन आणि अंदाजे तीन लाख रुपयांचे उत्पन्न हे इतर शेतकऱ्यांसाठी मोठे उदाहरण ठरत आहे.

धारूरमधील हा प्रयोग केवळ विक्रमी उत्पादनापुरता मर्यादित नाही, तर नैसर्गिक शेतीचा प्रभावी नमुना म्हणून पुढे येत आहे.

सातत्य, योग्य नियोजन आणि पारंपरिक ज्ञान यांची सांगड घातली तर शेतीत यश निश्चित मिळते, हे अर्जुन टोम्पे यांनी दाखवून दिले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : दुष्काळातही पैशांचा पाऊस; मिरची-आल्याच्या उत्पन्नातून शेतकरी मालामाल वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer's smart work yields 85 quintals from 20 kg seeds!

Web Summary : Arjun Tompe's innovative farming in Dharur, using minimal chemicals and traditional methods, produced a remarkable 85 quintals of wheat from just 20 kg of seeds. This success story, driven by dedication and natural practices, inspires local farmers seeking higher profits with lower costs.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीगहूपीक व्यवस्थापन