- राजकुमार चुनारकर
चंद्रपूर : शेती परवडत नसल्याची ओरड होत असतानाही चिमूर तालुक्यातील भिसी येथील एका प्रगत शेतकऱ्याने केवळ दोन एकरात तब्बल २४ क्विंटल हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन (Harbhara Production) घेतले असून शेतकऱ्यांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. संजय मुंगले असे त्या प्रगत शेतकऱ्याचे नाव आहे.
भिसी येथील शेतकरी संजय मुंगले यांना भिसी परिसरात १२ एकर शेतजमीन आहे. ते या जमिनीत हरभऱ्याची (Gram Farming) पारंपरिक शेती करत होते. परंतु, शेतीत फारसे उत्पादन मिळत नव्हते. अशातच मुंगले यांनी आगळा वेगळा प्रयोग करण्याचा निर्धार केला. प्रयोगासाठी दोन एकर शेतजमीन वापरून तेथे हरभरा पीक घेतले.
संपूर्ण औषधी मात्रा वापरून त्या प्लॉटमध्ये २४ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन झाले. त्यांच्या १० एकर शेतीत पारपंरिक पद्धतीने शेती केली. तिथे ८० क्विंटल हरभऱ्याचे उत्पन्न झाले. १० एकर शेतात प्रतिएकर आठ क्विंटल याप्रमाणे उत्पन्न झाले. परंतु, १० एकर शेतीच्या तुलनेत दोन एकर शेतीमध्ये २४ क्विंटल हरभरा पिकाचे उत्पादन झाले. या प्लांटमध्ये प्रतिएकर १२ क्विंटल याप्रमाणे उत्पन्न झाले आहे.
दोन एकरात असा केला यशस्वी प्रयोग !
सलाम किसान टीमने शेतकऱ्यांच्या शेतात एक विशेष प्रयोग केला. पिकासाठी वातानुकूलित उपाय प्रदान केला. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे आरोग्य, आणि उत्पादनात लक्षणीय सुधारणा झाली. पिकांच्या वाढीचा दर वाढला आणि उत्पादकताही सुधारली. या यशामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फायदा झाला.
शेतीत केलेला नावीन्यपूर्ण प्रयोग आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे दोन एकरात २४ क्विंटल हरभऱ्याचे उत्पन्न झाले. माझी पिके इतकी चांगली वाढताना मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. मात्र हा प्रयोग झाल्याचे समाधान आहे.
- संजय मुंगले, प्रगतिशील शेतकरी, भिसी