- गोपाल लाजूरकरगडचिरोली : महिलांनी मनात दृढ निश्चय केला तर तो तडीस नेण्याची क्षमता त्यांच्यात असते. जिद्द, चिकाटीच्या भरवशावर महिला कोणत्याही व्यवसायात जम बसवतात.
हीच बाब हेरत ललिता धनराज राजगिरे यांनी परंपरागत दुग्धव्यवसाय (Milk Business) 'उमेद'च्या माध्यमातून वाढवून त्यांनी दुधापासून पनीर, दही, तूप तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. काही महिन्यांत या व्यवसायाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून राजगिरे यांना चांगल उत्पन्नही मिळू लागले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiorli) देसाईगंज तालुक्याच्या कोरेगाव (चोप) येथील ललिता धनराज राजगिरे यांचा २००६ पासून पशुपालनाचा पारंपरिक व्यवसाय. सुरुवातीला त्यांच्याकडे दावणीला सहा म्हशी व तीन गायी होत्या. आता त्या दुधापासून, दही, तूप तसेच पनीरसुद्धा तयार करतात. पॅकेजिंग करून तुपाची विक्री ऑर्डरप्रमाणे करतात. यातून त्यांना दरवर्षी लाखो रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, पारंपरिक दूधविक्रीला व्यवसायाची जोड दिल्यानंतर चांगला नफा कसा कमवता येतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
उमेद अभियानातून कर्जजीवनोन्नती अभियानाशी जुळल्यानंतर त्यांनी ग्रामसंघाच्या माध्यमातून १ लाख, तर बँकेतून १ लाख असे दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले. ह्या कर्जातून त्यांनी तीन म्हशी व तीन गायी खरेदी करीत पशुपालनाचा व्यवसाय वाढविला. सध्या त्यांच्याकडे दुधाळ ६ गायी व १० म्हशी आहेत. घरीच पतीसमवेत त्या दुग्धव्यवसाय करीत असून चारापाणी व्यवस्थापन, जनावरांची काळजी घेणे, शेण काढणे यांसह विविध प्रकारची जबाबदारी त्या सांभाळत आहेत.
शेतात चाऱ्याची लागवडराजगिरे यांनी आपल्या शेतात जनावरांसाठी चाऱ्याची लागवड केलेली आहे. शेतात देशी-विदेशी गवतासह, मक्याची लागवड त्यांनी चारा म्हणून केलेली आहे. याशिवाय जनावरांना कोरडा चारा त्या उपलब्ध करून देतात.