Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रुट शेती अन् नर्सरीतुन वर्षाला एक कोटींचे उत्पन्न, वाचा सरला चव्हाण महिला शेतकऱ्याची यशोगाथा

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रुट शेती अन् नर्सरीतुन वर्षाला एक कोटींचे उत्पन्न, वाचा सरला चव्हाण महिला शेतकऱ्याची यशोगाथा

Latest News Annual Income of One Crore from Dragon Fruit Farming and NurseryThe Success Story of Sarla Chavan | Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रुट शेती अन् नर्सरीतुन वर्षाला एक कोटींचे उत्पन्न, वाचा सरला चव्हाण महिला शेतकऱ्याची यशोगाथा

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रुट शेती अन् नर्सरीतुन वर्षाला एक कोटींचे उत्पन्न, वाचा सरला चव्हाण महिला शेतकऱ्याची यशोगाथा

Dragon Fruit Farming : अनेक महिला शेतकऱ्यांसाठी त्या आशेचा व आत्मविश्वासाचा दीपस्तंभ ठरल्या आहेत.

Dragon Fruit Farming : अनेक महिला शेतकऱ्यांसाठी त्या आशेचा व आत्मविश्वासाचा दीपस्तंभ ठरल्या आहेत.

Dragon Fruit Farming : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील रायते हे एक सर्वसामान्य खेडेगाव. याच गावात राहणाऱ्या सौ. सरला जगन्नाथ चव्हाण या आज केवळ यशस्वी महिला शेतकरी म्हणून नव्हे तर नाविन्यपूर्ण शेती, आधुनिक तंत्रज्ञान, महिला नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून तसेच शून्यातून विश्व कसे निर्माण होते याचे त्या मूर्तीमंत उदाहरण म्हणून ओळखल्या जात आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी शेतीला उद्योगाचे स्वरूप दिले आणि अनेक महिला शेतकऱ्यांसाठी त्या आशेचा व आत्मविश्वासाचा दीपस्तंभ ठरल्या आहेत.

सरला चव्हाण यांच्याकडे वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. सुरुवातीला ही शेती पारंपारिक पद्धतीने केली जात होती. मका, बाजरी, ज्वारी आणि कांदा यांसारखी पिके घेतली जात होती. यासोबतच गाय, म्हैस पालनातून दुग्धव्यवसाय तसेच कुक्कुटपालन हे उत्पन्नाचे स्रोत होते. मात्र वाढता खर्च, अनिश्चित बाजारभाव आणि मर्यादित नफा यामुळे शेतीतून फारसा आर्थिक लाभ होत नव्हता. त्या काळात त्यांचे वार्षिक उत्पन्न केवळ १ लाख रुपयांपर्यंतच मर्यादित होते.

अशा परिस्थितीत अनेक जण शेती सोडण्याचा विचार करतात, मात्र सरलाताई यांनी शेतीतच काहीतरी वेगळे आणि नाविन्यपूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ड्रॅगन फ्रुट या विदेशी फळ पिकाबाबत माहिती मिळवायला सुरुवात केली. हे पीक खर्चिक आहे, जोखमीचे आहे आणि आपल्या भागात चालणार नाही, अशी टीका झाली, तरीही त्यांनी हार मानली नाही.

योग्य माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी त्यांनी दुसऱ्या राज्यात जाऊन ड्रॅगन फुट शेतीचे प्रशिक्षण घेतले. लागवड पद्धत, खांबांची रचना, पाणी व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, काढणी आणि बाजारपेठ यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. पाण्याची मोठी अडचण लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्या शेतात शेततळे उभारले, ज्यामुळे सिंचनाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली.

खर्च कमी व्हावा आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढावी यासाठी त्यांनी बायोगॅस स्लरीचा वापर सुरू केला, त्याचबरोबर गांडूळ खत निर्मिती, हिरवळीची खते, जीवामृत स्लरी, दशपर्णी अर्क यासारखे प्रयोग त्या स्वतः घरी करतात, ज्यामुळे खतांचा व औषधांचा खर्च कमी झाला, शेती अधिक सेंद्रिय झाली आणि उत्पादनात लक्षणीय सुधारणा झाली.

ड्रॅगन फ्रुट शेतीत मिळालेल्या यशानंतर अनेक शेतकरी राज्यातून व राज्याबाहेरून माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. रोपांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना भेटीसाठी आमंत्रित केले. त्यांनीही बागेची गुणवत्ता ओळखून बागेला रोपवाटिकेसाठी मान्यता दिली व शासनमान्य ड्रॅगन फ्रुट रोपवाटिका सुरू केली. त्यांच्या रोपवाटिकेला राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचा अधिकृत परवाना तसेच महाराष्ट्र शासनमान्य रोपवाटिका परवाना मिळाला आहे. या शासकीय मान्यतेमुळे इतर शेतकऱ्यांना उत्कृष्ट व दर्जेदार रोपे मिळू लागली असून त्यांच्या शेती व्यवसायाला नवा आयाम मिळाला आहे.

नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीः
सौ. सरला चव्हाण या केवळ स्वतःपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. ग्रामीण भागातील महिलांमध्ये असलेली भीती, खर्चाची धास्ती आणि माहितीचा अभाव दूर करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत आहेत. ड्रॅगन फ्रुट लागवड, रोपांची निवड, खर्च नियोजन, पाणी व्यवस्थापन, रोग नियंत्रण ते थेट बाजारपेठेपर्यंतचा संपूर्ण प्रवास त्या महिलांना सोप्या आणि आत्मविश्वास देणाऱ्या भाषेत समजावून सांगतात. महिलांनी केवळ मदतनीस न राहता शेतीतील निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाच्या भूमिकेत यावे, हा त्यांचा ठाम विचार आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज अनेक महिला शेतकरी ड्रॅगन फ्रुट लागवडीकडे वळत असून स्वतःचा स्वतंत्र शेती व्यवसाय उभारत आहेत.

आर्थिक परिवर्तन आणि जीवनातील बदल
पूर्वी वार्षिक १ लाख रुपये असलेले उत्पन्न आज ड्रॅगन फ्रुट शेती आणि नर्सरीमुळे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. हा बदल केवळ आर्थिक नसून जीवनशैलीतही आमूलाग्र परिवर्तन घडवणारा आहे. पूर्वी घराच्या नावावर केवळ एक कांद्याची चाळ होती; आज त्यांच्या कुटुंबाकडे स्वतःचा आलिशान बंगला, दोन ट्रॅक्टर, आधुनिक शेती अवजारे आणि कार आहे.

प्रेरणादायी विचार
सरला ताई सांगतात जसे रखरखत्या उन्हामध्ये गुलमोहर एकटाच बहरतो, तेव्हा त्याच्याकडे पाहून असे वाटते की बहरण्यासाठी परिस्थिती नाही, तर मनस्थिती भक्कम असावी लागते. मेहनतीच्या जोरावर यश मिळवण्यासाठी स्वतःला झोकून दिले पाहिजे. फक्त इच्छाशक्ती निर्माण करा, यश नक्कीच तुमच्या पदरी पडेल.

जय जवान, जय किसान.
सौ. सरला जगन्नाथ चव्हाण यांची ही यशोगाथा सिद्ध करते की, महिलांनी धाडसाने पुढाकार घेतला, योग्य मार्गदर्शन स्वीकारले आणि सातत्य ठेवले, तर शेतीतही मोठे यश मिळवता येते. आज त्या नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान, मार्गदर्शक आणि विश्वासाचा दीपस्तंभ ठरत आहेत.
 

Web Title : ड्रैगन फ्रूट की खेती: सरला चव्हाण की सफलता की कहानी, सालाना करोड़ों की कमाई।

Web Summary : सरला चव्हाण ने अपनी पुश्तैनी जमीन को एक आकर्षक ड्रैगन फ्रूट फार्म और नर्सरी में बदल दिया, जिससे सालाना करोड़ों की कमाई होती है। चुनौतियों को पार करते हुए, उन्होंने नवीन तकनीकों को अपनाया, महिला किसानों को सशक्त बनाया और महाराष्ट्र में सफलता का प्रतीक बन गईं।

Web Title : Dragon Fruit Farming: Sarala Chavan's success story yields crores annually.

Web Summary : Sarala Chavan transformed her ancestral land into a lucrative dragon fruit farm and nursery, earning crores annually. Overcoming challenges, she adopted innovative techniques, empowering women farmers and becoming a beacon of success in Maharashtra.