चेतन धनुरे
शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय अशी समजूत असताना, तुळजापूर तालुक्यातील काटी येथील हर्षवर्धन गुंड या २१ वर्षीय तरुणाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. (AI in sugarcane farming)
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सेन्सर आधारित व्यवस्थापनाचा वापर करून त्याने एकाच एकरातून तब्बल १०३ टन ऊस उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधले आहे.(AI in sugarcane farming)
पारंपरिक शेतीतून आधुनिकतेकडे
हर्षवर्धनचे कुटुंब गेल्या ३० वर्षांपासून ऊस शेती करत आहे. मात्र, यापूर्वी त्यांना एकरी जास्तीत जास्त ५० टनांपर्यंतच उत्पादन मिळत होते.
बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या खर्चामुळे शेतीत सुधारणा करण्याची गरज त्याला जाणवली. तंत्रज्ञानाची आवड असल्याने त्याने एआयचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
बारामती कृषी विज्ञान केंद्राची साथ
एआय तंत्रज्ञान शेतीत वापरण्याच्या उद्देशाने हर्षवर्धनने बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला.
या केंद्राने सुरू केलेल्या ५० शेतकऱ्यांच्या पायलट प्रोजेक्टमध्ये त्याची निवड झाली. २२ ऑगस्ट २०२४ रोजी एक एकर क्षेत्रात सुमारे ९० हजार रुपये खर्च करून एआय तंत्रज्ञान सक्रिय करण्यात आले.
सेन्सर आणि डेटा आधारित शेती
या प्रकल्पात मृदा सेन्सर आणि हवामान आधारित एआय प्रणाली बसविण्यात आली. यामुळे हर्षवर्धनला दररोज मोबाइलवर पुढील माहिती मिळू लागली.
तापमान आणि पर्जन्यमान
मातीतील ओलावा
पिकाला आवश्यक पाण्याचे प्रमाण
नत्र, स्फुरद, पोटॅश यांची गरज
कीड व रोग व्यवस्थापनाचे अलर्ट
या माहितीच्या आधारे त्याने खत, पाणी आणि औषधांचे अचूक नियोजन केले. परिणामी पिकाची वाढ निरोगी झाली आणि उत्पादनात मोठी झेप मिळाली.
उत्पादनात विक्रमी वाढ
एआयचा वापर करून घेतलेल्या या प्रयोगात एकरी तब्बल १०३ टन ऊस उत्पादन मिळाले. यामुळे हर्षवर्धनला एका एकरातून सुमारे २ लाख रुपयांनी अधिक उत्पन्न मिळाले असल्याचा अंदाज आहे.
शिक्षणासोबत शेतीचा मेळ
हर्षवर्धन सध्या तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत कृषी विषयाचे शिक्षण घेत आहे. शिक्षणातून मिळणारे ज्ञान आणि प्रत्यक्ष शेतातील प्रयोग यांचा योग्य मेळ घालत तो नवे प्रयोग करत आहे.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
हर्षवर्धनचा हा प्रयोग केवळ वैयक्तिक यश नसून, इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर डेटा आणि तंत्रज्ञानावर आधारित शेतीच भविष्यातील दिशा ठरू शकते, हे त्याच्या यशातून स्पष्ट झाले आहे.
बदलत्या हवामानानुसार पारंपरिक शेतीमध्ये बदल करावेच लागणार आहेत. तंत्रज्ञानाचीही आवड असल्याने कुतूहल निर्माण केलेल्या एआयचा प्रयोग केला. एकरातून २ लाखांचे उत्पन्न वाढले.- हर्षवर्धन गुंड, शेतकरी, काटी
Web Summary : Harnessing AI, a 21-year-old farmer in Tuljapur achieved a record 103 tons of sugarcane per acre. Using sensors and data from Baramati Krishi Vigyan Kendra, he optimized irrigation and fertilization, doubling his income and inspiring others.
Web Summary : तुलजापुर के 21 वर्षीय किसान ने एआई का उपयोग करके प्रति एकड़ 103 टन गन्ने का रिकॉर्ड उत्पादन किया। बारामती कृषि विज्ञान केंद्र से सेंसर और डेटा का उपयोग करके, उन्होंने सिंचाई और उर्वरक का अनुकूलन किया, जिससे उनकी आय दोगुनी हो गई और दूसरों को प्रेरणा मिली।