Pune : ज्वारी हे महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्वारीचे पीक केले जाते. पण आपल्या आहारात ज्वारीच्या भाकरीचे प्रमाण कमी आहे. ज्वारीचे आहारातील प्रमाण वाढावे यासाठी ज्वारीपासून पोहे, रवा, लाडू, चिवडा असे पदार्थ तयार केले जातात. इंदापूर येथील तात्यासाहेब फडतरे आणि त्यांच्या पत्नी सरोजिनी फडतरे यांनी मिलेट्स प्रक्रिया उद्योग सुरू केला असून ज्वारीची पहिली इडली २०१२ मध्ये तयार केली होती.
दरम्यान, फडतरे दाम्पत्य मागच्या १४ वर्षांपासून मिलेट्स प्रक्रिया उद्योगामध्ये काम करत असून त्यांनी ज्वारीच्या पिठापासून प्रक्रिया उद्योगाला सुरूवात केली होती. मिलेट्सचे येणाऱ्या काळातील महत्त्व लक्षात घेता त्यांनी ज्वारीवर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करायला सुरूवात केली. लोकांना बाजारात मिळणाऱ्या इतर उत्पादनाच्या तुलनेत ज्वारीचे उत्पादनांची चव आवडत नव्हती. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन आहारातील पदार्थ ज्वारीपासून बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
नाष्टा म्हणून अनेक लोक इडलीला प्राधान्य देतात त्यामुळे ज्वारीपासून इडली बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याअगोदर हैद्राबाद येथील ज्वारी संशोधन केंद्राकडून ज्वारीपासून इडली बनवण्याचे प्रयत्न सुरू होते. पण या इडली मिक्समध्ये तांदळाचे पीठ होते. पण फडतरे यांनी केवळ ज्वारीपासून इडली मिक्स तयार केले आणि ते लोकांच्या पसंतीस उतरले. फक्त ज्वारीपासून इडली बनवण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यांनी बनवलेली इडली ही पहिलीच ज्वारीची इडली ठरली.
साधारण २०१२ साली तयार झालेल्या या उत्पादनाने आता जगभरात नाव कमावलं आहे. फडतरे यांच्या 'गुड टू इट' या ब्रँडखाली जवळपास ४० ते ४५ उत्पादने विक्री केले जातात. यामध्ये ज्वारीपासून इ़डली मिक्स, ज्वारीचा रवा, ज्वारीचे पोहे, ज्वारीचा चिवडा आणि बाजरी, नाचणी या धान्यांपासून बनवलेले विविध पदार्थांचा सामावेश आहे.जगातील ८ देशांमध्ये या विविध उत्पादनांची निर्यातही केली जाते. त्यांच्या या व्यवसायाची उलाढाल आता अडीच कोटींच्या घरात पोहोचली आहे.