कोमल जाधव, छत्रपती संभाजीनगर
‘रानातल्या सोयाबीनचं नुकसान बघून गोगलगायींचा नायनाट करायचाच म्हणून मीही इर्षेला पेटलो होतो, पण गोगलगायींची संख्या वाढत गेली अन् माझं नुकसान झालं, ‘मी एक नाही, दोन नाही तर तब्बल तीन वेळेस सोयाबीन पेरलं, पण माझ्या वाट्याला गोगलगायींनी नुकसानीशिवाय काहीच येऊ दिलं नाही.’ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रामवाडी, ढवळापूरी येथील शेतकरी श्रीधर अवचार सांगत होते. तीनही लेकरं उच्च शिक्षित असून त्यांच्या खर्चासह कुटुंबाचा, दवाखान्याचा खर्च भागवत माझी नुकसानीत शेती सुरू असल्याचेही सांगतात.मराठवाड्यात गोगलगायीच्या प्रादूर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका लातूर जिल्ह्यात बसला असून शेतकरी हतबल झाला आहे. आजवर कोणत्याही पिकांवर कीड रोगांचा प्रादूर्भाव झाल्यानंतर काही ना काही उत्पादन हाती लागलेले आहे, मात्र गोगलगायीच्या प्रादूर्भावामुळे उगवलेले पीक पूर्णपणे खाल्ल्याने ज्या ज्या ठिकाणी प्रादूर्भाव झाला अशा ठिकाणी १०० टक्के नुकसान झाल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रामुख्याने लातूर, बीड, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हे नुकसान झाले आहे. पीकं वाचवायची तर रातबर जागायचं का?गोगलगाय रात्री साडेआठ नऊ वाजता जमिनीतून बाहेर येऊन झाडावर चढते. ती सकाळी चार ते पाच वाजेपर्यंत झाडावर चढून पाने खाऊन घेते. दिवसा मात्र ती जमिनीत सुप्तावस्थेत लपून राहते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रामवाडी ढवलापूरी येथील शेतकरी विजय कणसे, श्रीधर गंगाराम काटकर (४७) यांच्या शेतावर भेट दिली असता, हा प्रकार पहावयास मिळाला. रात्री नऊ वाजेदम्यान हळूहळू गोगलगायी जमिनीतून वर यायला नुकतीच सुरवात झाली होती. जसजशी रात्र होईल तसतशी गोगलगायी वर येऊन झाडावर चढत होत्या. नऊ ते बारा या तीन तासात एक पान गोगलगायींनी खाऊन फस्त केले. एकूण दहा एकर शेती, त्यापैकी, तीन एकरावर २७ जून रोजी सोयाबीन लावले होते. उगवण झाल्यानंतर कोवळ्या अवस्थेतच गोगलगायींनी पूर्णपणे खाऊन घेतलं.
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापनखर्चाचे असेही गणितशेतकरी श्री. काटकर यांनी सांगितले की, पहिल्या वेळेस सोयबीनला शेत तयार करण्यासाठी तीन हजार लागले. नांगरणी, रोटा, बेड, टोकण यंत्राने लागवड करणे, बीज प्रक्रियेला पाचशे रुपये, खते - दोन हजार प्रति एकर, बियाणे- साडेतीन हजार रुपये, लागवडीचा खर्च- दीड हजार, असा एकत्रित अंदाजे १३ हजार प्रति एकर तसेच तीन एकरसाठी ३६ हजार रुपये खर्च लागला होता.
दुसऱ्या वेळेस लागवड करण्यासाठी चार हजार रुपये खर्च लागला. तिसऱ्यांदाही चार हजार इतका खर्च करुनही हाती काही लागेल असे वाटत नसल्याची भावना त्यांनी यांनी बोलून दाखविली. मागील वर्षी याच शेतात श्री. काटकर यांना ४५ क्विंटल सोयाबीन झाले होते. त्याला प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्याचे दोन लाख १० हजार रुपयांपर्यंत पैसे मिळाले होते. मात्र यंदा काहीच उरले नाही. माझ्या घरात मी,पत्नी, दोन मुले आहेत. एक मुलगा बीबीए अंतिम वर्षात, आणि एक केमिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम आणि मुलगी बीसीएस द्वितीय वर्षात शिकते. तीनही अपत्ये उच्च शिक्षण घेत असल्याने खर्चचाी बाजू जास्तीची आहे, तर दुसरीकडे शेतातील खर्चही असल्याचे ते म्हणतात.....तर ३० क्विंटल झाले असते सोयाबीनविजय गणपत कणसे (३५, रा. रामवाडी, ढवळापूरी) यांना एकूण तीन एकर शेती आहे. त्यामध्ये मोसंबीचे झाडे आहेत. दीड एकरांत सोयाबीन लागवड केली आहे. मागील वर्षी आंतरपीक घेतल्याने प्रति एकरी दहा क्विंटल सोयाबीन झाले. यंदा सोयाबीनसाठी २५ हजार रुपये खर्च केला आहे. गोगलगायी नसत्या तर सोयबीन ३० क्विंटल झाले असते, त्याचे मागील वर्षी दीड लाख रुपये झाले असते, मात्र यंदा समस्या आहे, कारण शेंगा येण्याच्या आधीच गोगलगायी खाऊन घेत आहेत.
माझ्याकडे दहा शेळ्या आहेत, एक गाय आहे. घरात ७० वर्षांचे वडील, ६५ वर्षांची आई असल्याने शेतात मदतीला कोणी नाही. माझी एक मुलगी बारावीत (वय १८) शिकते, तर दुसरी दहावीत (१६) शिकते, तसेच १३ वर्षांचा मुलगा सहावीत शिकतो. शेतातच इतका खर्च केल्यानंतर मुलींचे शिक्षण आणि दवाखान्याचा खर्च कसा भागवू असा प्रश्न पडल्याचे शेतकरी विजय कणसे यांनी सांगितले.उपाय तरी किती करू?आम्ही सर्व उपाय करुन थकलो, गोगलगायी वेचून मीठाच्या पाण्याच्या द्रावणात टाकून नष्ट केल्या, त्यानंतर जमिनीत गाडूनही टाकल्या, मात्र प्रादूर्भावाची संख्याच इतकी अचानक वाढली की, दिवसभर काम करुन रात्री रात्रभर शेतात मुक्काम केला तरी गोगलगायीवर नियंत्रण मिळविणे शक्य होत नाही. शेतकरी श्री. कणसेंनी आपली व्यथा मांडली. माझ्याकडे दहा एकर शेती आहे. त्यापैकी मी तीन एकर सोयाबीन लावले होते. त्यातील सलग नुकसान झाले नाही, पण तीन एकरपैकी कुठे वीस गुंठे तर कुठे पाच, दहा असा तुकड्यांमध्ये नुकसान झाले आहे. मी हा खर्च सहन करुन तीनदा सोयाबीन लागवड केली, मात्र तीन्ही वेळेस सोयाबीन गोगलगायींनी खाऊन घेतले आहे, त्यामुळे मी आता सोयाबीन लावणे बंद केले. मात्र तीन वेळेस सोयाबीन लावायचा खर्च न परवडणारा आहे. आता उरलेल्या सोयाबीनचे किती पैसे येतील याचे गणित सांगू शकत नाही, पण जितके पैसे येतील त्यापेक्षा दुप्पट खर्च झालेला आहे, त्यामुळे सोयाबीन काढून फेकून देण्याचाही विचार मनात येतो, आणि न काढता तसेच ठेवले तर गोगलगायीचा प्रादूर्भाव वाढला तर प्रसार होत जाईल या द्वीधा मनस्थितीत मी अडकल्याचे श्रीधर काटकर सांगतात.
शंखी गोगलगाय आली आहे ? घाबरू नका वेळीच नियंत्रण करा
कृषी विद्यापीठात सुरू आहे संशोधनगोगलगायीच्या नियंत्रणसाठी परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय प्रयोगशाळेत संशोधन सुरू झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने गोगलगायींना वेचून नष्ट करणे हा उपाय असला तरी मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे, त्यामुळे विविध जैविक आणि कीटकनाशके यांचा गोगलगायींवरील परिणामांचा अभ्यास करण्यात आला त्यातून गोगलगायींना आकर्षिक करण्यासाठीचा प्रयोग अभ्यास करण्यात आला असून त्यावर संशोधन सुरु असल्याची माहिती कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर यांनी सांगितले.
पाऊस पडलाय सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर येणार असे करा नियंत्रण
सोयाबीनचे नुकसान आकडेवारीमराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, धाराशिव (उस्मानाबाद) आणि लातूर या चार जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीनची लागवड करण्यात येते. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक (JDA) आर. टी. जाधव यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यात एकूण तीन लाख २८ हजार ५२१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली होती. त्यापैकी ४७६ हेक्टरवर गोगलगायचा प्रादूर्भाव झाला तर जालना जिल्ह्यात दोन लाख तीन हजार ७३९ हेक्टर लागवडीपैकी २१६ हेक्टरवर तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २८ हजार ३९१ हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली त्यापैकी १९३ हेक्टरवर गोगलगायींच हल्ला झाल्याचे श्री. जाधव म्हणाले. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, पाटोदा, परळी या तालूक्यात जास्त नुकसान झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुलजापूर भागात सोयाबीनवर प्रादूर्भाव झाला.
komal.jadhav9221@gmail.com