Join us
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यात तब्बल साडेअकरा लाखांचे उत्पन्न; हळद पिकात 'या' शेतकऱ्याने केली किमया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:56 IST

हळद पीक घेण्यासाठी ऊस गेल्यानंतर रोटर मारून सरी सोडली आणि त्यामध्ये ५० किलो ताग विस्कटण्यात आला. ताग उगवून आल्यानंतर ४५ ते ५० दिवसांनी नांगरट करून जमिनीत गाडला.

जगन्नाथ कुंभारमसूर कवठे, ता. कराड येथील प्रगतशील शेतकरी लालासाहेब पाटील यांनी आपल्या अडीच एकर क्षेत्रातील हळद पिकातून नऊ महिन्यात साडेअकरा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.

यामुळे त्यांनी आपल्या शेतीमधून इतर शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. कवठे येथील लालासाहेब पाटील हे माजी सरपंच आहेत.

हळद पीक घेण्यासाठी ऊस गेल्यानंतर रोटर मारून सरी सोडली आणि त्यामध्ये ५० किलो ताग विस्कटण्यात आला. ताग उगवून आल्यानंतर ४५ ते ५० दिवसांनी नांगरट करून जमिनीत गाडला.

त्यानंतर रोटर मारून ४.५ फूट बेड सोडला आणि हळदचे उच्च प्रतीचे सेलम जातीचे तयार बियाणे सांगलीवरून आणण्यात आले. हळद लागवडीसाठी एकरी साधारण ८५० ते ९०० किलो बियाणे लागते.

बियाणे लावण्यापूर्वी योग्य उगवण क्षमतेसाठी आणि रोगमुक्त उगवणीसाठी बीजप्रक्रिया करण्यात आली. कुदळीने खणून लागण करण्यात आली.

लागण करण्यापूर्वीही बेसल डोस म्हणून डीएपी टाकण्यात आला. त्यानंतर गरजेनुसार खुरपणी करण्यात आली. पिकाची योग्य वाढ, फुटवे आणि फुगवण होण्यासाठी तीनवेळा खत टाकून भर लावण्यात आली.

प्रत्येक अमावास्येला कीटकनाशक व सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्रित करून फवारणी केली. पौर्णिमेला बुरशीनाशकची फवारणी करण्यात आली.

हळद साधारण साडेआठ ते नऊ महिन्यांनी ट्रॅक्टरने फणून काढण्यात आली. त्यातून बियाणे वेगळे काढून सावलीमध्ये झाकून ठेवण्यात आले. राहिलेली हळद कुकरमार्फत उकडण्यात आली.

साधारण महिनाभर हळद वाळवून मशीनने पॉलिश आणि त्यामधून वर्गीकरण करून सांगलीच्या मार्केटमध्ये लिलावासाठी नेण्यात आली.

लिलावात सोर गड्डाला २५ हजार रुपये प्रतिक्विंटल, उच्च प्रतीच्या गड्डाला १६ हजार, अंगठा गड्डा १३ हजार आणि दुय्यम प्रतीच्या गड्डाला १२ हजार रुपये दर मिळाला.

विक्रमी उत्पादन◼️ अडीच एकरात बियाण्यासाठी ठेवलेली सव्वा दोन लाख रुपयांची हळद आणि हळद वाळवण्यासाठी ३० हजार रुपयांचे नेट हे सर्व मिळून साडेअकरा लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न निघाले.◼️ लालासाहेब पाटील यांचा आधुनिक शेती करण्याकडे कल आहे. त्यामुळे त्यांनी हळद पिकात विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्याचबरोबर ते आले, पपई आणि ऊस आदी पिकेही घेतात.

शेतकऱ्यांनी पिकांमध्ये पालट म्हणून जमिनीचा पोत आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारण्यासाठी हळद, आले यासारखी पिके घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी, भारत देशाचे पेटंट हळद असून वायदे बाजार सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीचे दर अजून वाढतील. उसाला बिवड म्हणून अशी पिके घेण्यास हरकत नाही. - लालासाहेब पाटील, शेतकरी

अधिक वाचा: शक्तीपीठ महामार्ग आराखड्यात केले ‘हे’ मोठे बदल; कसा आहे नवीन आराखडा? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer earns ₹11.5 lakhs in 9 months with turmeric farming.

Web Summary : Lalasaheb Patil, a farmer from Karad, earned ₹11.5 lakhs in nine months from his turmeric crop using innovative techniques, setting an example for other farmers. He used high-quality seeds and followed a meticulous process from land preparation to processing.
टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेतीपीकपीक व्यवस्थापनशेतकरीखतेसेंद्रिय खतकराडसेंद्रिय शेती