महेश जगतापसोमेश्वरनगर: जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि निसर्गाशी मैत्री असेल, तर शेतीत अशक्य काहीच नाही, हे बारामती तालुक्यातील निंबुत येथील प्रयोगशील शेतकरी दीपक जगताप यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
गेली १८ वर्षे अंजीर पिकाचा अनुभव पाठीशी असलेल्या जगताप यांनी महाबळेश्वरच्या मातीतील स्ट्रॉबेरी निंबुतच्या खडकाळ जमिनीत यशस्वीपणे फुलवली आहे.
अवघ्या अर्ध्या एकरात घेतलेल्या या प्रयोगातून आतापर्यंत लाखो रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. निंबुत गात ऊस पिकासाठी ओळखले जात असले, तरी जगताप यांच्या वाट्याला आलेली आठ एकर डोंगराळ, खडकाळ जमीन उसासाठी योग्य नव्हती.
मात्र, परिस्थितीला दोष न देता त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत काहीतरी वेगळे करण्याचा निर्धार केला. २००६ साली त्यांनी एक एकरात अंजीर शेती सुरू केली.
सुरुवातीच्या अडचणींनंतर २०१२ साली अंजीर पिकात त्यांना यश मिळाले. त्यानंतर माळरानावर सात एकर अंजीर बाग त्यांनी विकसित केली.
पुण्यात नोकरी करणारे मोठे बंधू गणेश जगताप यांनीही नोकरी सोडून शेतीत सहभाग घेतला. त्यांच्या प्रयोगशील शेतीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली.
देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः बागेला भेट देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते. अंजीरमध्ये यश मिळाल्यानंतर दोन्ही भावांनी स्ट्रॉबेरी पिकाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर, पाचगणी, भिलार व वाई परिसराचा त्यांनी अभ्यास दौरा केला. तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून तांत्रिक माहिती आत्मसात केली.
त्यानंतर 'विंटर डॉन' या जातीची अर्ध्या एकरात लागवड करण्यात आली. जगताप यांच्या मते, कोणत्याही पिकाचे यश हे झाडांच्या पानांचा अभ्यास करण्यात दडलेले असते.
पानांचा रंग, पोत आणि वाढ पाहून एनपीके अन्नद्रव्यांची कमतरता ओळखणे आणि त्यानुसार खत व फवारणीचे अचूक नियोजन करणे, हा त्यांच्या यशाचा मंत्र ठरला आहे. "ज्याला निसर्ग ओळखता येतो, तो शेतीत कधीच अपयशी होत नाही," असे ते सांगतात
शेतकऱ्यांसाठी प्रेरणाअर्ध्या एकर स्ट्रॉबेरी पिकासाठी सुमारे ४ लाख रुपये खर्च आला असून आतापर्यंत ९ लाखांचे उत्पादन मिळाले आहे. निंबुतसारख्या पट्ट्यात स्ट्रॉबेरीचा हा यशस्वी प्रयोग तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नवी प्रेरणा ठरत आहे.
Web Summary : Deepak Jagtap, a farmer from Baramati, successfully cultivates strawberries on his rocky land, earning ₹9 lakhs from just half an acre. His innovative approach inspires local farmers to explore alternatives to traditional sugarcane farming.
Web Summary : बारामती के किसान दीपक जगताप ने अपनी पथरीली जमीन पर सफलतापूर्वक स्ट्रॉबेरी की खेती की, जिससे उन्हें सिर्फ आधे एकड़ से ₹9 लाख की कमाई हुई। उनका नवीन दृष्टिकोण स्थानीय किसानों को पारंपरिक गन्ना खेती के विकल्प तलाशने के लिए प्रेरित करता है।