Join us

रेशीम शेती प्रयोगातून चमकले नशीब; संजय नाईकवाडे यांनी निर्माण केला शेतकऱ्यांपूढे आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:43 IST

Success Story : देऊळगाव गात (ता. सेलू) येथील अल्पभूधारक शेतकरी संजय पांडुरंग नाईकवाडे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सन २००५ पासून रेशीम शेती सुरू केली. त्यात त्यांचे नशीब चमकले. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत त्यांनी इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

रेवणआप्पा साळेगावकर 

परभणी जिल्ह्याच्या देऊळगाव गात (ता. सेलू) येथील अल्पभूधारक शेतकरी संजय पांडुरंग नाईकवाडे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सन २००५ पासून रेशीम शेती सुरू केली. त्यात त्यांचे नशीब चमकले. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत त्यांनी इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

संजय नाईकवाडे यांना ३ एकर शेती आहे. प्रारंभी त्यांनी १ एकर मध्ये व्ही-१ वाणाची तुती लागवड करून रेशीम किडांचे संगोपन सुरू केले. रेशीम विभागात प्रशिक्षण घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंडीपुंज उत्पादन सुरू करत त्यात सातत्य ठेवले.

या व्यवसायात यश मिळू लागल्याने सन २०११ मध्ये कोष उत्पादनासाठी स्वतंत्र शेड उभारले. पुढे सन २०१५ पासून त्यांनी 'चॉकी' म्हणजे 'रेशीम कीटक' याच्या बाल अवस्थेत उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. यासाठी त्यांनी कोल्हापूर येथून अंडीपुंजं आणत उत्कृष्ट संगोपणात रेशीम अळीची दोन अवस्थांचे संगोपन करतात.

त्यानंतर मराठवाड्यात शेतकऱ्यांना रेशीम अळी विक्री करण्यासाठी स्वतः चे 'चॉकी रिअरिंग सेंटर' स्थापन केले. यामधून दर महिन्याला १३ ते १६ बॅच विकल्या जातात, परभणी, जालना आणि बीड या जिल्ह्यांत त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. या दर्जेदार रेशीम अळीपासून शेतकरी उत्तम दर्जेदार कोषचे उत्पादन मिळवत आर्थिक सुबत्ता साधत आहेत.

शासनाने घेतली दखल

संजय नाईकवाडे यांचा रेशीम शेती उद्योगाची शासनाने दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह विविध संस्थांनी नाईकवाडे यांचा सन्मान केला आहे. संजय नाईकवाडे यांचा रेशीम शेती व्यवसाय हा अल्पभूधारक शेतक-यांसाठी प्रेरणादायी असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नव्या संधी आणि आर्थिक स्थैर्य देणारा ठरणारा आहे.

३० लाखांची गुंतवणूक

• संजय नाईकवाडे यांनी स्वतःच्या उत्पन्नातून ३० लाखांची गुंतवणूक केली आहे. पत्नी अनिता, मुले दीपक व दिनेश असा कुटुंबीयांचा सहभाग मोलाचा आहे.

• योग्य आर्थिक नियोजनामुळे 3 त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही ही बाब विशेष आहे. त्यांचा मोठा मुलगा दिपक याने एम. एस्सी. केमिस्ट्रीपर्यंत शिक्षण पूर्ण करून तो खासगी कंपनीत कार्यरत आहे.

• रेशीम व्यवसायात वर्षभर उत्पन्न मिळावे यासाठी त्यांना ३ एकर जमीन अपुरी पडू लागली. त्यांनी अडीच एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन हा व्यवसाय वर्षभर सुरू ठेवला आहे.

हेही वाचा : जांभूळ शेतीतून लाखोंची लॉटरी; दलदलमय जमिनीवर दत्तात्रय यांचा बहाडोली जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग

टॅग्स :शेतकरी यशोगाथारेशीमशेतीशेती क्षेत्रशेतकरीशेतीमराठवाडाबाजार