Join us

उसाच्या पट्ट्यात आले पिक बहरले; पाडेगावचे शेतकरी रमेश यांनी एकरात ११ लाख कमवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 14:35 IST

पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यास शेती फायद्याची ठरते, याचे उदाहरण म्हणजे पाडेगाव (ता. फलटण) येथील प्रगतशील शेतकरी रमेश अडसूळ.

राहीद सय्यदलोणंद : पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यास शेती फायद्याची ठरते, याचे उदाहरण म्हणजे पाडेगाव (ता. फलटण) येथील प्रगतशील शेतकरी रमेश अडसूळ.

केवळ एका एकरात तब्बल ४५ टन आले उत्पादन घेऊन त्यांनी ११ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, सातारा तालुक्यांत आले पीक घेतले जाते.

अशाच पद्धतीने रमेश अडसूळ यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करत पाडेगावच्या जमिनीत आल्याची मुहूर्तमेढ रोवली. पारंपरिक पीक पद्धतीत बदल करत त्यांनी दीड एकर शेतात बेड पद्धतीने आले लागवड केली.

तीन महिने आधीपासून सखोल मशागत करताना शेणखत, कोंबडी खत, राख, निंबोळी आदींच्या १५ ट्रॉली खतांची भर त्यांनी दीड एकरात टाकली. ठिबक सिंचन, तीनवेळा बेसल डोस, वेळोवेळी फवारण्या, हे व्यवस्थापनाचे पैलू ठरले.

पहिल्या वर्षी आले उत्पादन त्यांनी बियाण्यासाठी विकले. यंदा, मात्र उत्पादन इतके जोमदार झाले की एका एकरातून सुमारे १७ लाख रुपयांचे उत्पादन मिळाले.

यासाठी सुमारे ६ लाखांचा खर्च गेला. तर निव्वळ नफा ११ लाख रुपयांचा पदरात पडला. यामुळे उत्साह वाढून त्यांनी आणखी सव्वा दोन एकरात आल्याची लागवड केली आहे.

त्यांच्या या यशामागे प्रगतशील शेतकरी बाबासो नेवसे यांचा सल्ला लाभदायक ठरला. तसेच वाठार स्टेशन येथील मोहन फाळके व लोणंदचे सोमनाथ लकडे यांचेही मार्गदर्शन मिळाल्याने पिकाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम झाले.

पारंपरिक शेतीत बदल करून नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यास उत्पन्नात चांगली वाढ होते. फलटण, पुरंदर, खंडाळा, कोरेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी माझ्या प्लॉटला भेट देत आहेत. आले शेतीविषयी मार्गदर्शनासाठी मी सदैव तयार आहे. - रमेश अडसूळ, शेतकरी

अधिक वाचा: Kadvanchi Ranbhaji : पावसावर येणाऱ्या कडवंची रानभाजीला मोठी मागणी; कसे होतात आरोग्याला फायदे?

टॅग्स :शेतीशेतकरीपीकपीक व्यवस्थापनखतेकराड