Join us

कांद्याला पर्याय शोधला, सोनवणे बंधूंनी फुलवली ड्रॅगन फ्रूटची शेती, उत्पन्न किती मिळतंय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:35 IST

Farmer Success Story : कांद्याला मिळत असलेला कवडीमोल दर, पावसाने होत असलेले नुकसान यामुळे त्यांनी ड्रॅगन फ्रुट करण्याचा निर्णय घेतला.

- अनिल अलगट नाशिक : येवला तालुक्यातील हडपसावरगाव येथील दोन प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या पाण्यावर शेतात ड्रॅगन फ्रूटची शेती (Dragon Fruit Farming) फुलवली आहे. ठिंबक सिंचनाची सुविधा असल्याने माळरानावर ड्रॅगन फ्रूटची दोन एकर क्षेत्रावर यशस्वी लागवड केली होती.

येथील सुनील व प्रदीप कचरू सोनवणे या दोन भावांनी सहाय्यक कृषी अधिकारी हरिभाऊ खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून ही शेती सुरू केली आहे. आता त्यांना उत्पन्न सुरू झाले असून, त्यामधून साधारणतः १५० रुपये किलो या दराने ड्रॅगनफ्रूटची विक्री होते. त्यांना एका वर्षात सुमारे ३ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते आहे.

सोनवणे कुटुंब प्रामुख्याने कांदा शेती करत आले आहे, मात्र कांद्याला मिळत असलेला कवडीमोल दर, पावसाने होत असलेले नुकसान यामुळे त्यांनी ड्रॅगन फ्रुट करण्याचा निर्णय घेतला. याच ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतील मधल्या अंतरावर ते इतर भाजीपाल्याची पिके घेतात. या बागेची देखभाल सुनील सोनवणे यांच्या पत्नी दीपाली या करतात. त्या कृषि सखी असून, त्यांनी ही बाग फुलवली आहे. 

तसेच त्यांच्या आईदेखील नेत्यांना मदत करीत आहेत. शेतकरी व्यवसाय हा यांत्रिकीकरण व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परवडणारा होऊ शकतो. प्रयोगशील शेती करुन हडपसावरगाव या दुर्गम भागात त्यांनी ड्रॅगन फ्रूटस शेती यशस्वी वाटचाल केली आहे. इतर पीक पध्दतीचा अवलंब करून शेतात नवनवीन प्रयोग करीत असतात. एकच पीक न करता पीक पद्धतीत बदल करून प्रयोग केले पाहिजेत, असेही सोनवणे सांगतात.

आम्ही ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. आता चांगले उत्पन्न मिळते आहे. इतर शेतकऱ्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करावेत, प्रयत्न केले तर यश मिळते. त्यासाठी कष्ट, जिद्द व चिकाटी महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी कष्टाची कास कधीही सोडू नये.- सुनील सोनवणे, हडपसावरगाव

टॅग्स :शेतकरी यशोगाथाफळेफलोत्पादनशेती क्षेत्रनाशिक