Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा नाद नाय करायचा! अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी फुलवली दीड कोटी उत्पन्नाची संत्रा शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:39 IST

लांडगे कुटुंबीयांनी सुमारे १० वर्षांपूर्वी फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. सुरुवातीपासून योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यामुळे आज ही संत्री बाग बहरली आहे.

निंबळक सारोळा बद्दी (ता. अहिल्यानगर) येथील प्रगतशील शेतकरी भीमराज लांडगे, सुभाष लांडगे व बाळासाहेब लांडगे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत शाश्वत फळबाग शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

दोघांच्या १४ एकरांवर संत्री लागवड करून उत्पादन वाढीसह त्यांनी आर्थिकदृष्ट्याही मोठी झेप घेतली. या संत्री बागेतून त्यांना जवळपास दीड कोटींपर्यंत उत्पन्नाचा विश्वास आहे.

सारोळा बद्दी येथील लांडगे कुटुंबीयांनी सुमारे १० वर्षांपूर्वी फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. सुरुवातीपासून योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यामुळे आज ही संत्री बाग बहरली आहे.

पारंपरिक पिकांचे अनिश्चित उत्पन्न, वाढता खर्च आणि पाणीटंचाई लक्षात घेता, फळबाग शेती हा दीर्घकालीन व फायदेशीर पर्याय ठरू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

भीमराज लांडगे यांची ही संत्री बाग केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नसून, परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

योग्य नियोजन, सेंद्रिय घटकांचा वापर, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभघेतल्यास फळबाग शेतीतून मोठे उत्पन्न मिळू शकते, हे या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे.

पारंपरिक शेतीत अडकून न राहता बदल स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लांडगे यांचा हा प्रवास दिशादर्शक ठरणारा आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन फायदेशीर◼️ कृषी विभाग व तज्ज्ञांचे मार्गदर्शन बागेसाठी महत्त्वाचे ठरले. कृषी सहायकांनी वेळोवेळी फळबागेची पाहणी करून आवश्यक सल्ला दिला.◼️ डॉ. यशवंत गाडेकर यांनी औषधे, फवारणीचे वेळापत्रक, रोग व कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले.◼️ दर आठवड्याला भेट देऊन केलेल्या सूचन सूचनांमुळे फळबागेची चांगली वाढ झाल्याचे ते सांगतात.

सेंद्रिय पद्धतीचा प्रभावी वापर◼️ संत्री बागेसाठी लांडगे यांनी शेण खत, शेंगदाणा पेंडीचा वापर करून मशागत केली.◼️ भेसळ फवारणीसारख्या आधुनिक, पण नियंत्रित उपाययोजना केल्या. परिणामी, झाडांची वाढ जोमदार झाली.◼️ सध्या एका झाडाला सरासरी १२ कॅरेटपर्यंत संत्र्यांचे उत्पादन मिळत असून, फळांचा आकार, रंग व चव उत्कृष्ट असल्याने बाजारात या संत्र्याला चांगली मागणी आहे.

अनुदानाचा योग्य उपयोग◼️ फलोत्पादन विभागामार्फत मिळालेल्या शेततळे, पेपर (मल्चिंग), ट्रिपल यांसारख्या योजनांचे अनुदान योग्य पद्धतीने वापरले.◼️ शेततळ्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढली. वेळेवर व नियोजनबद्ध सिंचनामुळे फळांची गुणवत्ता टिकून राहिली.◼️ परिणामी सध्या बाजारात विक्रीसाठी येणारी संत्री उच्च प्रतीची असून, त्यांना उच्चतम दर मिळत आहे.

अधिक वाचा: सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना आता १० टक्के रक्कम भरून मिळणार सौर कृषीपंप; वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Ahmednagar Farmers Reap Crores with Innovative Orange Farming Techniques

Web Summary : Ahmednagar farmers embraced sustainable orange farming, achieving ₹1.5 crore income. Utilizing expert guidance, organic methods, and government schemes, they transformed traditional farming into a profitable venture, inspiring others with their success.
टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेतकरीशेतीफळेफलोत्पादनअहिल्यानगर