Join us

तात्यासाहेबांची कमी पाण्यावरील हरितगृहातील शेती; कलरफूल ढोबळी आली हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 1:31 PM

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील प्रयोगशील शेतकरी तात्यासाहेब आण्णा भोंग यांनी हरितगृहामध्ये रंगीत ढोबळी मिरचीची २५ गुंठे क्षेत्रावर लागवड करत केवळ तीन महिन्यांत लाखो रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे.

निलकंठ भोंगइंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील प्रयोगशील शेतकरी तात्यासाहेब आण्णा भोंग यांनी हरितगृहामध्ये रंगीत ढोबळी मिरचीची २५ गुंठे क्षेत्रावर लागवड करत केवळ तीन महिन्यांत लाखो रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे.

निमगाव केतकीमध्ये पाण्याचा कोणती कायमस्वरूपी स्रोत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना हंगामी शेतीशिवाय पर्याय नाही. मात्र, या परिस्थितीवर मात करीत प्रगतीशील शेतकरी तात्यासाहेब भोंग यांनी प्रायोगिक तत्वावर रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली, निमगाव केतकी मध्ये विविध तरकारी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असते.

ढोबळी, टोमॅटो, झेंडू, वांगे, मिरची, कोबी, फ्लॉवर, कलिंगड, खरबूज विविध रोपांची निर्मिती तात्यासाहेब भोंग स्वत: करत असल्याने आपल्याही शेतामध्ये नवीन प्रयोग करण्याची कल्पना त्यांनासुचली त्यांनी यासाठी बाहेरील प्लॉट वरती जाऊन पाहणी करत स्वत:च्या नर्सरीत या रोपांची निर्मिती केली, ऑगस्टमध्ये २४ गुंठे क्षेत्रामध्ये लाल व पिवळ्या रंगाच्या ढोबळी मिरचीची आठ हजार रोपे लावली.

रोपे स्वतःच्या नर्सरी तयार केल्याने त्यांना खर्च कमी आला. पहिल्याच वर्षी या कलर ढोबळी मिरचीचे उत्पन्न सुरु झाले असून त्यांनी तीन महिन्यांत चौदा टन उत्पादन काढले. अजून चार महिने कलर ढोबळी मिरचीचे उत्पादन हाती येणार आहे. यातून आणखी दहा ते पंधरा लाख रुपये मिळणार असल्याची माहिती तात्यासाहेब भोंग यांनी दिली.

ठिबक सिंचनाद्वारे दिवसातून फक्त पंधरा ते तीस मिनिटे या पिकास पाणी सोडतात. इतर पिकापेक्षा अत्यंत अल्प प्रमाणात पाणी लागत असल्याने पाण्याचीही बचत होत आहे. शिवाय हरितगृहामध्ये पीक असल्याने ढोबळी मिरची पिकाचा दर्जाही उत्तम असून एक मिरची किमान २०० ते २५० ग्रॅम इतक्या वजनाची झाली आहे.

प्रत्येक तोडणीला साधारण मागणीनुसार आठशे किलो ढोबळी मिरची तोडावी लागते. पाच ते सहा दिवसाला तोडणी करावी लागते. आतापर्यंत चौदा टन उत्पन्न झाले आहे. ही रंगीत मिरची पुणे, मुंबई, दादर या बाजारपेठेत पाठवली जाते. तसेच व्यापारी जागेवरून खरेदी करतात मोठ्या शहरामध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये पिझ्झा-बर्गर, सूप, चायनीज पदार्च बनविण्यासाठी याचा वापर होत आहे. यामुळे सध्या भोंग यांनी लागवड केलेल्या मिरचीला चांगली मागणी आहे.

रंगीत ढोबळी मिरची लागवडीस हरितगृहामधील तापमान किमान १८ अंश सेल्सिअस व कमाल ३५ अंश सेल्सिअस आवश्यक असते. या पिकासाठी योग्य सापेक्ष आर्द्रता ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत असली पाहिजे, हे प्रमाण हरितगृहामध्ये नियंत्रित करता येते. पर्यायाने हरितगूहातील मिरचीचा दर्जा चांगला राहतो. - भाऊसाहेब रुपनवर, कृषी अधिकारी, इंदापूर

स्वतःची नर्सरी असल्याने आपल्याही शेतामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची कल्पना आल्याने मी या रंगीत ढोबळ्या मिरचीची लागवड केली, कमी पाण्यात येणारे हे पीक असून लागवडीनंतर अडीच महिन्यांपासून उत्पन्न सुरू होते. तीन महिन्यात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले असून साधारणपणे एका सीजनमध्ये २५ गुंठ्यामध्ये ३० टनांचे उत्पन्न हाती येते. आणखी चार महिने हे मिरचीचे पीक येणार असून शेतकऱ्यांना उन्नतीकडे नेण्यासाठी हरितगृहामधील शेती फायदेशीर ठरत आहे. - तात्यासाहेब भोंग, प्रगतशील शेतकरी, निमगाव केतकी

अधिक वाचा: रोपे निर्मितीने गाठला 'कळस'.. इंदापूरातील हे दुष्काळी गाव ठरलं रोपवाटिकेत सरस

टॅग्स :शेतकरीशेतीभाज्यापीकइंदापूरमिरची