मनोहर बोडखेदौंड तालुक्यातील वडगाव दरेकर येथील कापसे बंधूंनी भीमा नदीच्या पाण्यावर प्रतिकूल परिस्थितीतून तुरीचे पीक फुलवले आहे. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या शेतीत तुरीच्या एका झाडाला बाराशेच्या जवळपास शेंगा लागलेल्या असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे.
माउली कापसे आणि गणेश कापसे या बंधूनी जिद्द आणि चिकाटीतून सहा एकरांत तुरीचे पीक घेतले आहे. तूर हे पीक चांगले उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. दरम्यान, नदीपट्ट्यातील शेतकरी तुरीच्या पिकाचे उत्पादन घेऊ लागले आहेत.
वडगाव दरेकर येथे भीमा नदीकाठी कापसे बंधूंची शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतीत पाच बाय दोन फूट टोकन पद्धतीने तुरीची लागवड केली आहे. अडीच एकर तूर उत्पादित करण्यासाठी एकरी सव्वा किलो बियाणे लागले.
भीमा नदीवरून विद्युत पंपाच्या सहाय्याने शेतीत पाणी आणून तुरीच्या पिकाला पाणी दिले. आवश्यकतेनुसार खत मात्रा दिली. त्यानंतर झाडे दहा फूट उंच झाल्याने कीटकनाशकांची फवारणी ड्रोनच्या सहाय्याने दोन वेळा केली.
तूर पिकाची वैशिष्ट्ये म्हणजे सुमारे १० ते १५ क्विंटल उत्पादन मिळते आणि त्यातून चांगला फायदाही होतो. तूर पिकाचा कालावधी १७० दिवसांच्या जवळपास आहे. पिकाचे शेंडे ४५ ते १० दिवसांनी खुडल्यामुळे उत्पन्न वाढले.
द्विदल वनस्पतीचे उत्पादन फायद्याचेतूर पिकाकडे वळण्याचे मुख्य कारण म्हणजे नदीपट्ट्यात ऊस पिकासाठी अतिपाणी वापरणे तसेच सातत्याने ऊस हेच पीक घेत असल्याने जमिनी खराब होत चालल्या आहेत, त्यावर उपाययोजना म्हणून द्विदल वनस्पतींचे उत्पादन घेणे फायदेशीर ठरते. कारण, अशा पिकांमध्ये नत्र स्त्रीकरण करण्याचा गुणधर्म असतो अशा पिकांना कमी पाणी लागते. पाणी साचण्याचे प्रमाण कमी होते, पर्यायाने जमिनीमध्ये हवा आणि पाण्याचे योग्य प्रमाण राखले जाते.
पिकांचा फेरपालट झाल्याने जमिनीचा पोत सुधारतो तसेच गेल्या तीन-चार वर्षापासून तूर पिकाला चांगला भाव मिळत आहे. तुरीचे उत्पन्न सहा महिन्यांत मिळत असल्याने आम्ही या पिकाकडे वळलो आहोत. या कामी तालुका कृषी अधिकारी राहुल माने, 'आत्मा'चे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर, कृषी सहायक शिवाजी कदम यांची वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. - माउली कापसे, शेतकरी
अधिक वाचा: Farmer Success Story : बोरगावच्या शिवाजी वाटेगावकरांनी केळी पिकात ११ महिन्यात केली ११ लाखांची कमाई