इस्माईल जहागीरदार
वसमत : डोंगराच्या कुशीत असलेली आंबट गोड करवंद (Karvand) आता वसमतच्या मातीत बहरली आहेत. ही किमया केली तालुक्यातील इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव आडकिने या शेतकऱ्यांनी.
वसमत शहरापासून जवळच असलेल्या इंजनगावच्या एका कष्टकरी शेतकऱ्याने (Farmer) करवंदांची शेती करत ६ एकरांमध्ये वर्षाकाठी ९ लाखांचे उत्पन्न घेतले. त्यांनी करवंद महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेशासह देशातील अनेक राज्यांत पोहोचत आहेत.
तालुक्यातील इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव आडकिने यांनी २०१९ मध्ये ६ एकर शेतजमिनीत करंवद घेणे सुरू केले.
रोप स्वतः तयार करून त्याची लागवण करत संगोपन केले; परंतु सुरुवातीला करवंदांना म्हणावा तेवढा भाव मिळाला नाही; परंतु गेल्या दोन वर्षापासून त्यांना दरवर्षी एकरी दीड लाख रुपये करवंदांच्या शेतीतून मिळत आहेत.
सहा एकरांवर करवंद शेती केली असून दरवर्षी १ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. सद्य: स्थितीत करवंदास ४० रुपये प्रतिकिलो बाजारात दर मिळत आहे.
उतर प्रदेशमधील जैनूर, आंध्र प्रदेशातील विजयवाडा, राजस्थानमधील पुष्कर यासह जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पंढरपूर येथून करवंदांस मागणी येऊ लागली आहे. करवंद शेती संगोपनासाठी कुटुंबातील सर्व सदस्य सहकार्य करतात. त्यामुळे तर करवंद देशाभरात पोहोचले आहेत.
शेतात १२ ते १५ फूट रुंदीवर व लांबीस दोन ते तीन फुटांवर करवंदाच्या रोपाची लागवड केली. लागवड खर्च कमी व उत्पन्न जास्त मिळत असल्याने करवंद शेती फायद्याची ठरत आहे. तसेच करवंदाच्या शेतीत आंतरपीकही घेता येऊ शकते.
करवंदाच्या कुंपणातून मिळाते उत्पन्न
शेतातील पिके वन्यप्राणी फस्त करू लागले आहेत. वन्यप्राण्यांपासून पिकांना संरक्षण मिळावे यासाठी धुऱ्यावर कुंपण करण्याऐवजी करवंदाची लागवड केली तर पिकांचे संरक्षण होऊ शकते. दुसरीकडे करवंदाचे उत्पन्न देखील मिळू शकते.
करवंद प्रक्रिया उद्योग उभारणी...
सदाशिव आडकिने यांनी त्यांच्या शेतात करवंदावर प्रक्रिया करून चेरी, ज्यूस यासह करवंदाचे असे प्रकार तयार करण्यासाठी प्रक्रियेसाठी कारखाना उभारणी केली आहे. लवकरच तो कारखाना सुरू होईल. त्यातून या भागातील बेरोजगार यांना रोजगारही मिळेल.
करवंदाची मिळतेय साथ
आजमितीस करवंदास ४० रुपये प्रतिकिलो दर मिळतो आहे. माझ्याकडे जवळपास १५ ते १६ लाख रुपयांचे करवंद आहेत, भविष्यात करवंदावर प्रक्रिया करण्यासाठी कारखाना उभारणार आहे. - सदाशिव आडकिने, शेतकरी, इंजनगाव