दीपक माळीमाडग्याळ : प्रतिकूल हवामानात कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर जत तालुक्यातील शेतकरी फळबागातून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. अशीच यशोगाथा आहे, जत तालुक्यातील कुलाळवाडी येथील शेतकरी म्हाळाप्पा गणपती मोटे यांची.
नोकरीबरोबरच शेतीची आवड जोपासत २०१८ मध्ये त्यांनी आपल्या एक हेक्टर जमिनीत एक हजार डाळिंब झाडांची लागवड केली. सुरुवातीच्या चार- पाच वर्षांत मनासारखे उत्पन्न मिळाले नाही
पण सध्या चांगले उत्पन्न मिळत असून चार लाख ५० हजार खर्च वजा जाता ३० ते ३५ लाख रुपये उत्पन्न मिळेल, असे म्हाळाप्पा मोटे यांनी 'लोकमत'शी बोलताना आपली यशोगाथा सांगितली.
डाळिंब बागाचे व्यवस्थापन करण्यासाठी काशीनाथ धडस यांना ठेवले होते. डाळिंब पिकाचे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी माडग्याळ येथील युवराज सावंत यांची भेट घेतली. डाळिंब पिकाबाबतची माहिती घेत त्यांनी योग्य नियोजन करत यंदा भरघोस उत्पन्न मिळविले आहे.
गेल्या वर्षी त्यांना बागेतून ११ लाखांचे उत्पन्न मिळाले; पण यावर समाधानी न होता जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी युवराज सावंत यांचे मार्गदर्शन घेत व्यवस्थापक काशीनाथ धडस यांच्या साथीने बाग फुलविली आहे.
आज त्यांच्या बागेतून एक हेक्टरमधून १८ ते २० टन डाळिंब निघणार आहेत. डाळिंबाचे उत्पादन आणि दर्जाही चांगला आहे. त्यामुळे प्रतिकिलोला १८० रुपये दराने मागणी होत आहे.
त्यांचे आतापर्यंत लागवडीसाठी चार लाख ५० हजार खर्च वजा जाता ३० ते ३५ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे, असा दावाही मोटे यांनी केला आहे.
लहानपणापासूनच शेतीची आवड होती; पण नोकरी असल्याने दोन्ही बाजू सांभाळत उत्पन्नावर मर्यादा येत होती. काशीनाथ धडस यांचे व्यवस्थापन आणी युवराज सांवत यांच्या मार्गदर्शनामुळे यंदा डाळिंबीतून चांगले उत्पन्न मिळविले आहे. - म्हळाप्पा मोटे, शेतकरी, कुलाळवाडी, ता. जत
बाजारभावाचा अचूक अंदाज, पाणी व खतांचे योग्य नियोजनामुळे मोटे यांना डाळिंबाचे चांगले उत्पन्न मिळाले आहे. ७० टक्के सेंद्रिय व ३० टक्के रासायनिक खंताचा वापर करून मोटे यांनी डाळिंब पिकाचे नियोजन केले. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करत शेती केल्यास शेतीपासून निश्चित नफा कमविता येतो. - युवराज सावंत, कृषी सल्लागार, माडग्याळ, ता. जत