Join us
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Success Story : बोरगावच्या इंजिनीअरने केली रताळाची शेती साठ गुंठ्यात काढले साडेसहा लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 11:50 IST

अभियांत्रिकीपर्यंतचे उच्च शिक्षण घेतलेले बोरगाव (ता. वाळवा) येथील रामराव सीताराम पाटील या तरुणाने नोकरीच्या मागे न धावता आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड देऊन फायदेशीर केली आहे.

नितीन पाटीलबोरगाव : अभियांत्रिकीपर्यंतचे उच्च शिक्षण घेतलेले बोरगाव (ता. वाळवा) येथील रामराव सीताराम पाटील या तरुणाने नोकरीच्या मागे न धावता आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड देऊन फायदेशीर केली आहे.

नुकतेच त्यांनी ६० गुंठ्यातील रताळ्यातून विक्रमी ९ टनाचे उत्पादन घेऊन सहा लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळवले आहे. केवळ तीन महिन्यात चांगले उत्पादन घेऊन तरुणांपुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.

अधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती कशा पध्दतीने फायदेशीर होते, हे रामराव पाटील यांनी दाखवून दिले आहे. रामराव पाटील नेहमीच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेतीचे आरोग्य मजबूत ठेवण्यासाठीही प्रयत्न करत आहेत.

शेतीला वेगळ्या पिकाच्या फेरपालटाने शेतीचा पोत सुधारतो. उसाला पर्याय म्हणून ते भाजीपाल्यासह रताळे लागवडीकडे वळले आहेत. रामराव पाटील म्हणाले, रताळी शेतीसाठी शेतकऱ्याला बियाणावर काहीच खर्च येत नाही.

जगात मोफत बियाणे मिळणारे एकमेव पीक आहे. हे पीक तीन महिन्यात येत असून, रताळ्याची शेती करण्यासाठी एकरी ७३ हजार रुपये इतका खर्च येतो. सुरुवातीला शेताची मशागत करताना प्रथम उसाचे पीक काढून मशागत करून घेतली.

रोटर मारून ३ फुटी सरी सोडली. लावणीसाठी मित्रांकडून मोफत बियाणे आणले. हे बियाणे कोणीही मोफत देते. दि. ४ मे रोजी लावण केली आहे. लावणीसाठी कामगारांचा एक हजार रुपये आला. लावणीनंतर १५ दिवसांनी पहिली आळवणी घातली. कीटकनाशकाची एक फवारणी केली असून, त्यास दीड हजार रुपये खर्च आला आहे.

मुंबईला चांगली बाजारपेठ रताळ्याला मुंबई मार्केटमध्ये ७२ हजार रुपये प्रतिटन दर मिळाला आहे. दर चांगला मिळाल्यामुळे ६० गुंठ्यात ६ लाख ५० हाजार रुपयांपर्यंतचे उत्पादन मिळाले. रताळी हे पीक कृष्णा काठावरील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवडीखाली आणायला हवे. पण, अनेक वेळा या पिकाचा दर घसरतो. १५ ते २० रुपयांवर येतो. यामुळे शेतकरी हतबल होऊन या पिकाकडे पाठ फिरवतो. मात्र, या पिकात सातत्य ठेवल्यास अनेक वर्षांचा तोटा एकाच वर्षात भरून निघू शकतो. या पिकाच्या यशात माझे वडील सीताराम पाटील, कुटुंबीय, मित्रांचे सहकार्य मोलाचे आहे, अशी प्रतिक्रीया तरुण शेतकरी रामराव पाटील यांनी दिली.

अधिक वाचा: Farmer Success Story : खुटबावच्या युवा शेतकऱ्याची किमया दोडक्याच्या पिकातून तीन महिन्यांत साडेतीन लाखांचे उत्पन्न

टॅग्स :शेतीशेतकरीपीकफलोत्पादनभाज्याऊस