Join us

Farmer Success Story : डबल उच्च पदवीधारकाने प्राध्यापकाची नोकरी सोडून शेती करत केली केळी एक्सपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 12:54 IST

प्राध्यापकाची नोकरी सोडून आपल्या औषध रसायनशास्त्र व सेंद्रिय रसायनशास्त्र या दोन उच्च पदव्यांचा उपयोग शेतीसाठी करता येईल का अशी संकल्पना डोक्यात घेऊन नोकरीला लाथ देऊन शेतीत यशस्वी वाटचाल केली.

बापू नवलेकेडगाव: प्राध्यापकाची नोकरी सोडून आपल्या औषध रसायनशास्त्र व सेंद्रिय रसायनशास्त्र या दोन उच्च पदव्यांचा उपयोग शेतीसाठी करता येईल का अशी संकल्पना डोक्यात घेऊन नोकरीला लाथ देऊन शेतीत यशस्वी वाटचाल केली.

दौंड तालुक्यातील पारगाव सालू मालू येथील युवा शेतकरी रणधीर सस्ते यांनी शेतीत विविध प्रयोग करीत केळी परदेशात निर्यात केली आहे. नुकतेच वडिलांना मधुमेहाच्या आजाराने ग्रासले असल्यामुळे शेती करायला घरात कोणीच नव्हते.

अचानक सर्व जबाबदारी आपल्यालाच घ्यायला लागेल हा विचार करून शेतात विविध नाविन्यपूर्व प्रयोगांना सस्ते यांनी सुरुवात केली. सुरुवातीला कठीण संकटांचा सामना करावा लागला.

अत्याधुनिक तंत्र वापरून वेगवेगळे प्रयोग करून तंत्रशुद्ध शेती करण्याचा आपल्या शिक्षणाचा वापर येथे होऊ शकतो असा त्यांना सल्ला त्यांचे स्नेही पोपटभाई ताकवणे यांनी दिला. शेतीमध्ये उत्पन्न मिळते मात्र त्यासाठी योजना आखाव्या लागतात बाजारपेठांचा अभ्यास असावा लागतो.

या सगळ्या गोष्टींचा बारकाईने सस्ते यांनी अभ्यास केला त्यानंतर शेतीमध्ये केळी, पपई व ऊस यासारखे हुकमी पिके घेण्याच्या मागे लागले. नोकरी सोडल्यामुळे व्यापारी शेती करण्याची वेळ आली होती. कुटुंबाला शेती शिवाय दुसरा आर्थिक हातभार नाही.

पारंपारिक ऊस या पिकाला बगल देत दर्जेदार निर्यात क्षम केळी लागवडीचा निर्णय घेतला.  डिसेंबर २०२३ ला निर्यातक्षम केळीचे पाटील बायोटेकचे जी ९  वाणाची लागवड केली. एकावेळी तीन एकर केळी करणे म्हणजे धाडसी निर्णय होय.

ठिबक सिंचनचे नियोजन करताना १६ मिमी चे पाईप वापरले. औषधाचे नियंत्रण व व्यवस्थापन त्यामुळे उत्तम पद्धतीने करता आले. मजुरांकडून लागवड, फवारण्या, खतपाणी या गोष्टी व्यवस्थित करून घेतल्या.

निसर्गाने देखील उत्तम साथ दिली. मेहनतीचे रसाळ गड केळीला लागलेले दिसले. बाग एकदम जोमात आली. आतापर्यंत २७ टन केळी निर्यात करण्यात आली. त्यापैकी १० टन टर्की, इराण येथे १० टन तर अरब येथे ७ टन एवढी केळी निर्यात करण्यात आली आहे.

विकास कृषी सेवा केंद्र पारगाव येथून वेळोवेळी कृषी सल्ला मिळत गेला. कैलास ताकवणे व रामकृष्ण ताकवणे यांनी आधुनिक शेतीचे धडे दिले. कुटुंबातील वडील राजाराम, आई नंदा, पत्नी पूजा यांचे विशेष सहकार्य लाभले.

सध्याच्या मार्केट मध्ये १९ रुपये हा उच्चांकी दर त्यांना निर्यातीसाठी मिळाला आहे. ५ ते ६ इतकी उच्च रिकव्हरी मिळाली आहे. एकूण सरासरी १ लाख २५ हजार एकरी खर्च आला.

दोनदा एम एस्सी केलेल्या युवा शेतकरी तंत्र शुद्ध पद्धतीने अभ्यास पूर्ण शेती करत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांना कुतूहल वाटत आहे.

अधिक वाचा: Ghonas Snake : थंडीत सुरु होतो या अतिविषारी सापाच्या प्रजननाचा काळ कशी घ्याल काळजी

टॅग्स :केळीशेतीशेतकरीपीकफलोत्पादनइराणठिबक सिंचनप्राध्यापक