गोविंद शिंदे
नांदेड जिल्ह्याच्या चिंचोली (ता. कंधार) येथील सूर्यकांत यांनी पारंपरिक शेतीला बगल देत, कृषी विभागाच्या मदतीने सेंद्रिय हळदीचे पीक घेतले. ज्यात योग्य नियोजन, दर्जेदार सेंद्रिय खत, पाण्याचा सुयोग्य वापर आणि कमी परिश्रमात केवळ २५ गुंठ्यांत ३५ क्विंटल हळदीचे उत्पादन काढले आहे.
हळदीचा लाल सेलम बेडतर लागवडीसाठी केवळ एक लाख खर्च करून पाच लाखांचे उपन्न मिळविले आहे. सूर्यकांत लांबाटे या तरुण शेतकऱ्याने २५ गुंठ्यांत मे महिन्यात शेणखत टाकून प्रथम रोटर केले.
त्यानंतर, बैलजोडीच्या साह्याने चार फुटांचे बेड तयार केले. या बेडवर भेसळ खते म्हणून त्यांनी लिंबोळी पेंड, शेणखत, विविध सेंद्रिय खताचा सर्वाधिक वापर केला.
जून महिन्यात चार बोटाच्या अंतरावर बेणे टाकले. पुढे पिकामध्ये तण येऊ नये, म्हणून त्यांनी रासायनिक तणनाशकाचा डोस दिला, तसेच ठिबकद्वारे पाणी दिले.
या सेलम हळदीच्या विक्रमी उत्पन्नासाठी यावेळेस ड्रोनद्वारे पाच ते सहा वेळा फवारणी केली. त्यामुळे केवळ एक लाखाच्या खर्चात पाच लाखांचे उत्पन्न मिळाले तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतल्याने कष्ट देखील कमी झाले.
मिरची आंतर पिकातून ३० हजार रुपयांचे उत्पन्न
हळद पिकात अनेक शेतकरी मिरची आणि झेंडूच्या फुलाची लागवड करतात. त्याचे कारण म्हणजे हळदीमध्ये रोगराईचे प्रमाण कमी व्हावे, हाच उद्देश असतो. सूर्यकांत या तरुण शेतकऱ्याने हळदीमध्ये आंतरपीक म्हणून मिरचीचे पीक घेतले, त्यातून त्यांना ३० हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न देखील मिळाले आहे.