अतुल जाधवदेवराष्ट्रे : चिंचणी (ता. कडेगाव) येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत शिवाजी पवार ऊर्फ पिनू पवार यांनी तब्बल ६० गुंठे क्षेत्रात विक्रमी २७ टन आले उत्पादन घेत २० लाख रुपयांचे उत्पन्न कमवले आहे. सलग दोन वर्षे त्यांनी कमी क्षेत्रात आले पिकात विक्रमी उत्पादन घेऊन ५० लाख रुपये कमवले आहे.
निव्वळ माळरान व मुरमाड शेतामध्ये चंद्रकांत पवार यांनी आले पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी शेताची खोलवर नांगरट करून जमीन भुसभुशीत करून घेतली. त्यामध्ये शेणखत, कोंबडी खत व कंपोस्ट खत यांचे एकत्र मिश्रण करून दोन महिने भट्टीत तयार करून ठेवलेले खत शेतामध्ये विस्कटले.
त्यानंतर त्या शेतामध्ये साडेचार फूट रुंदीचे बेड तयार करून त्यावर मे २०२३ रोजी आले पिकाची लागवड केली. त्याच बेडवर ठिबक सिंचनाद्वारे आले पिकाला लागवड व पाणीपुरवठा देणे सुरू ठेवले. या शेतातून आठ महिन्यात तब्बल २७ टन विक्रमी उत्पादन निघाले. ७१ हजार रुपये टनाने आल्याची विक्री करण्यात आली. यातून शिवाजी पवार यांना १९ लाख मिळाले.
गतवर्षीसुद्धा ५० गुंठे आले पिकात २५ टन आले निघाले होते. गतवर्षी दर चांगला असल्यामुळे प्रतिटन एक लाख ३५ हजार रुपये दराने विक्री करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना ५० गुंठ्यात ३३ लाख रुपये मिळाले होते. प्रगतशील शेती केल्याबद्दल अनेक वेळा आमदार मोहनराव कदम, शांताराम बापू कदम यांनी शेतीला भेट देऊन चंद्रकांत यांचे कौतुक केले आहे.
अधिक वाचा: उसाला फाटा देऊन; सीताफळाची लागवड, पल्प तयार करून केली उत्पन्नाची कमाल
आले पिकांमधून सोन्याची कमाई पिकात सातत्य असेल तर यश मिळते याचा प्रत्यय चंद्रकांत यांच्या कामातून मिळत आहे. ते सलग पाच वर्षे झाले आले पिकाचे उत्पादन घेत आहे. पहिल्या तीन वर्षात त्यांना कमी दर मिळाला. मात्र, गतवर्षी व यावर्षी आले पिकाने त्यांना ११० गुंठ्यात अर्धा कोटी रुपयांची कमाई करून दिली आहे.
आंतरपीकही फायदेशीरआले पिकात त्यांनी आंतरपीक म्हणून मिरचीचे उत्पादन घेतले होते. यातून त्यांना तब्बल दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.