वडिलोपार्जित फळबाग शेतीला आंतरपीक तुरीची जोड देत आपल्या कृषीच्या शिक्षणाच्या जोरावर युवराज पाथ्रीकर हा तरुण तुर शेतीत नाविन्यपूर्ण उत्पादन घेत आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या सोलनापुर (ता. पैठण) येथील कृषी पदवीचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी असलेला युवराज भास्करराव पाटील पाथ्रीकर यास वडिलोपार्जित ६५ एकर शेती आहे. ज्यात १४ एकर डाळिंब, ३० एकर मोसंबी, १२ एकर सीताफळ, ०२ एकर पेरू असून उर्वरित क्षेत्र सिंचन विहीर व इतर पारंपारिक पिकांसाठी राखीव आहे.
ऑक्टोंबर २०२२ मध्ये वडिलांच्या दुःखद निधनातून सावरत युवराज आज आपल्या आई मंगल यांच्यासोबत शिक्षण घेत असलेल्या दोन बहिणीच्या कुटुंबाचा गाडा मोठ्या जिकरीने चालवत आहे. तसेच वडिलांनी रुजवून दिलेली तूर शेतीची २०१९ पासूनची परंपरा देखील युवराज यांने यावर्षीही अगदी चोखपणे सांभाळली आहे.
यंदा संपूर्ण मोसंबी फळबागेत आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करण्यात आली होती. ज्यात गोदावरी वाणाचे सरासरी १२ किलो बियाणे तीन एकर क्षेत्रात १४ बाय १.३ फुट अंतरावर टोकन पद्धतीने लागवड केले होते. तर इतर क्षेत्रात वेगळ्या वाणाच्या तुरीची लागवड होती.
कृषी शिक्षणामध्ये मिळत असलेल्या ज्ञानाच्या जोरावर अचूक खत व्यवस्थापन, प्रभावी सिंचन व्यवस्था तर आई मंगल यांचे अनुभव सोबत वडिलांचे शिकवण यातून युवराज याने यंदा गोदावरी तुरीचे तीन एकरात ४२ क्विंटल उत्पादन घेतले आहे. तर इतर तूर क्षेत्रात सरासरी एकरी ७-९ क्विंटल उत्पादन मिळाले आहे.
योग्य नियोजन महत्वाचे ..
बहुतांश शेतकरी झाडांवर विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्यास त्यावर कीटकनाशकांची फवारणी करतात. मात्र, अनेकदा या किडींचे नियंत्रण वेळेत होण्यास दिरंगाई झाल्यास त्यांचे योग्य रितीने नियंत्रण होत नाही. यासाठी आपण किड येण्याआधीच प्रतिबंधात्मक निंबोळी अर्क किंवा दुसरे रासायनिक औषधांची फवारणी केली, तर याचा खूप मोठा फायदा होतो. हे आम्ही आमच्या शेतातील प्रयोगातून शिकलो असल्याचे युवराज सांगतो.
२०१९ पासून बी डी एन ७११ वाणाच्या तुरीचे नियमित उत्पादन घेत असलेल्या पाथ्रीकर कुटुंबातून वडिलांच्या पश्चात युवराज याने संपर्क केला तेव्हा त्याला गोदावरी वाणाची माहिती देत लागवड करण्याचे सुचविले. ज्यात युवराज याने कष्ट घेत योग्य व्यवस्थापन राखले ज्यातून आज भरघोस उत्पादन मिळाले आहे. - रामेश्वर ठोंबरे, कृषी सहाय्यक, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर.