Join us

अबिदअली काझी यांनी नोकरीच्या मागे न धावता फळशेतीला दिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 10:21 AM

वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यावेळी बँकेत अथवा अन्यत्र नोकरी मिळवणे सहज शक्य होते. मात्र, नोकरी करण्याऐवजी लांजा तालुक्यातील देवथे येथील अबिदअली अब्दुल अजीज काझी यांनी बागायतीवर लक्ष केंद्रित केले.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यावेळी बँकेत अथवा अन्यत्र नोकरी मिळवणे सहज शक्य होते. मात्र, नोकरी करण्याऐवजी लांजा तालुक्यातील देवथे येथील अबिदअली अब्दुल अजीज काझी यांनी बागायतीवर लक्ष केंद्रित केले. ८० एकर क्षेत्रावर आंबा, काजू लागवड केली आहे. याशिवाय ३,५०० आंबा कलमे कराराने घेऊन व्यवसाय वृद्धिंगत केला आहे.

अबिदअली यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, शेतीची आवड असल्याने नोकरीच्या मागे न लागता शेतीवर लक्ष केंद्रित केले. ८० एकर क्षेत्रावर नियोजनाने आंबा, काजू कलमांची लागवड केली आहे. १,५०० हापूस आंबा, ३,००० काजू व ७०० केसर आंबा लागवड केली आहे. केसर आंब्याची लागवड तीन वर्षांपूर्वीची आहे. मात्र, हापूस व काजू लागवडीचे उत्पन्न सुरू झाले आहे. शिवाय ३,५०० कलमांची आंबा बाग कराराने घेत आहेत. अबिदअली स्वतः पदवीधर आहेत, त्यामुळे त्यांनी मुलाचेही शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचा मुलगा मुस्तकीम हा केमिकल इंजिनिअर आहे. मात्र, वडिलांप्रमाणे यालाही शेतीची आवड असल्याने मुस्तकीमसुद्धा चांगल्या पगाराची नोकरी सोडून बागायतीकडे वळला आहे. शेतीच्या कामात तो वडिलांना मदत करीत आहे.

खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात विक्रीला पाठविण्यापर्यंत अबिदअली यांचे योग्य नियोजन असते. सुरुवातीचा २० टक्के आंबा मार्केटला पाठवतात. उर्वरित ८० टक्क्याची ते स्वतःच विक्री करतात. ओल्या काजूगरांना चांगली मागणी असल्याने काजूतून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

ओल्या काजूगरांची विक्रीओला असो वा वाळलेल्या काजूला बाजारात चांगली मागणी असते, त्यामुळे गर काढून अविदअली विक्री करत आहेत. किलोला दोन हजार ते १,५०० रुपये दर मिळतो. ओल्या काजूला शेवटपर्यंत मागणी असते. ६० टक्के ओल्या काजू गरांची विक्री करतात, तर उर्वरित ४० टक्के काजू वाळवून विक्री करतात. आंब्याप्रमाणेच काजू पिकासाठी ते परिश्रम घेत आहेत. हवामानातील बदलाचा अंदाज घेत कीटकनाशकांचा वापर करीत असल्याने कीड रोगापासून पिकाचे संरक्षण होत आहे. काजू गराचा दर्जा व उत्पादन चांगले असून, विकीही सुलभ होत आहे. 'काजूला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. चांगला पैसा मिळवून देणारे हे पीक असल्याचे अबिदअली यांनी सांगितले. दरवर्षी पाच ते सहा टन काजूची विक्री ते करीत आहेत.

थेट ग्राहकांशी संपर्क साधून विक्रीसध्या अबिदअली यांच्या बागेत मोहर, कणी, वाटाणा, सुपारी, चिकूच्या आकाराचा आंबा आहे. कीडरोगापासून त्यांनी फळांचे रक्षण केले आहे. सुरुवातीच्या आंब्याला मार्केटमध्ये चांगला दर मिळतो, मात्र, आवक वाढली की, दर गडगडतात. त्यामुळे थेट ग्राहकांशी संपर्क करून खासगी विक्रीवर विशेष भर दिला आहे. वर्जेदार फळ, घरबसल्या उपलब्ध होत असल्याने मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांतील ग्राहक पैसा चावला तयार होतात. खासगी विक्रीवर सुरुवातीपासून लक्ष दिल्याचा त्यांना चांगला फायदा झाला आहे

यांत्रिक अवजारांचा वापरनवीन पिढी शेतीच्या कामासाठी निरुत्साही असल्याने कामासाठी मजुरांची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, यांत्रिक अवजारांमुळे कामे सुलभ झाली आहेत. ग्रासकटर, पाॅवर स्प्रेअरमुळे साफसफाई व फवारणीचे कामाचे तास कमी झाले आहेत. वेळेबरोबर श्रम, पैसाही वाचला आहे. पाण्याच्या योग्य वापरासाठी ठिबक सिंचन सुविधा बागेत बसविली आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही. आवश्यक एवढे पाणी झाडांना मिळते.

योग्य मार्गदर्शनहवामानातील बदलाचा आंबा, काजू पिकावर परिणाम होत आहे. गेल्या ३० ते ३२ वर्षांचा अनुभव असतानाही अबिदअली कृषितज्ञ संदीप डोंगरे यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी बागेत रक्षक सापळे बसविले आहेत. आंब्यातील साका रोखण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करत आहेत, बागेतील पालापाचोळा एकत्र करून त्याचे खत झाडांसाठी वापरत आहेत. रासायनिक खते, कीटकनाशकांचा मर्यादित वापर अबिदअली करीत असून, त्यांच्या बागेतील कलमे तरारलेली व मोहराने लगडली आहेत.

टॅग्स :शेतकरीआंबापीकशेतीकोकणफळेआंबाकीड व रोग नियंत्रणखतेनोकरीबँक