Join us

बिऊरच्या अभिजित पाटलांची कमाल परदेशी झुकिनी शेतीत केली धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:21 AM

बिऊर (ता. शिराळा) गाव शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन काढण्यामध्ये प्रसिद्ध आहे. येथील अभिजित आकाराम पाटील या युवकाने गतवर्षीपासून झुकिनी या परदेशी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे.

विकास शहाशिराळा : बिऊर (ता. शिराळा) गाव शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन काढण्यामध्ये प्रसिद्ध आहे. येथील अभिजित आकाराम पाटील या युवकाने गतवर्षीपासून झुकिनी या परदेशी भाजीपाला पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या उन्हाळ्यामुळे मुंबई व पुण्यामध्ये याची मोठी मागणी आहे. मात्र अद्याप अपेक्षेप्रमाणे दर नाही. या काकडीवर्गीय पिकाची तीन महिने योग्य ती काळजी घेतली तर चार पैसे अधिक मिळतात हे लक्षात आल्यानं अभिजित पाटील यांनी २५ गुंठ्यात झुकिनीची लागवड केली आहे.

सुरुवातीला अनुभव नसल्याने थोडाफार तोटाही सहन करावा लागला. मात्र नंतर तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय खत व जिवाणू खताचा वापर केला. गावखताचा वापर, पाण्याचे नियोजन, वेळेवर आंतरमशागत, कीटकनाशकांचा वापर याची सांगड घालून उत्पादन घ्यायला सुरुवात झाली.

मुंबई मार्केटला माल पाठवायला सुरुवात झाली. कमी खर्चात उसापेक्षा जास्त उत्पादन मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी झुकेनियाची लागवड केली आहे. झुकिनी हे काकडीवर्गीय पीक आहे त्यामुळे त्याचे आहारात काकडीसारखेच महत्त्व आहे.

फळांवर हलक्या धारा असणारे, घट्ट गराचे, झुडपासारखे वाढ असणारे पीक आहे. सलाडसाठीही याचा उपयोग होतो. या पिकाला मोठ्या हॉटेल्समधून मागणी वाढत आहे. काकडीसारखेच दिसणारे हे फळ अधिक मुलायम, कुरकुरीत आणि चविष्ट असल्याने याचा वापर व प्रसार इतर लोकांमध्येही होण्यास वाव निर्माण झाला आहे.

अधिक वाचा: दुष्काळी भागात आल्याचा प्रयोग; १४ गुंठे आल्यातून छप्परफाड कमाई

सध्या लहान प्रमाणावर लागवड होत असली तरी काकडीसारखाच उपयोग होत असल्याने याची लोकप्रियता वाढून मागणी वाढत आहे. या पिकाला मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी भुसभुशीत आणि सुपीक जमीन लागते.

उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात येणारे हे पीक आहे. पेरणी जानेवारीमध्ये करावी. रोपे रूट ट्रेनरमध्ये तयार करून एक महिन्याची रोपे मुख्य शेतात लावतात. साधारणतः ४२ दिवसांनी पीक काढणीसाठी तयार होते. यामध्ये अनेक वाण आहेत.

हिरवे आणि सोनेरी पिवळे असे दोन प्रकार असून हे परदेशातील आहेत. यामध्ये आपल्या भागात लागवड करण्यासाठी गोल्डन, गोल्ड रश आणि अॅरिस्टोक्रॅट या वाणांचा प्रामुख्याने वापर केला जातो.

झुकिनीची गर्द हिरव्या रंगाची फळे असलेली जात लोकप्रिय आहे. फळांचे उत्पादन अधिक येते. अॅरिस्टोक्रॅट हा संकरित वाण आहे. हिरव्या रंगाचा, लवकर येणारा व फळाचे अधिक उत्पादन ही या वाणाची वैशिष्ट्ये आहेत.

डिसेंबर महिन्यात ग्रीन व यलो या दोन्हीही वाणांची लागवड केली. बागही जोमात आली आहे. साधारणतः ४२ दिवसांनी उत्पादन सुरू झाले. उत्पादन सुरु झाल्यापासून मागणी वाढली आहे; पण आजअखेर दरात वाढ झालेली नाही. दर वाढतील ही अपेक्षा आहे. - अभिजित पाटील, शेतकरी

टॅग्स :शेतकरीभाज्यासांगलीपीकशेतीशिराळासेंद्रिय खतबाजार