Join us

Success Story : नाद खुळा! सातारच्या ३ सख्ख्या बहि‍णींनी पुण्यात सुरू केला भरडधान्यांपासून बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय

By दत्ता लवांडे | Updated: January 1, 2025 18:02 IST

मोठी बहीण पुजा मुळीक हीचे लग्न झाले असून आयटीमध्ये चांगल्या पदावर नोकरी करते. दुसऱ्या क्रमांकाची प्रणाली मुळीक वकील आहे तर लहान बहीण अनुजा मुळीक हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन पूर्णवेळ मिलेट्स कुकीज बनवण्याचं काम करते. त्यांना एक भाऊ असून तो परदेशात काम करतो.

Pune :  मूळच्या साताऱ्याच्या पण शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक झालेल्या तीन सख्ख्या बहि‍णींनी मिलेट्स पासून कुकीज् म्हणजेच बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय सुरू केलाय. पुजा मुळीक, प्रणाली मुळीक आणि अनुजा मुळीक असं या तीन बहि‍णींचं नाव असून पुण्यातील उंड्री येथे त्यांचा हा व्यवसाय आहे. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी लागणारा सर्व कच्चा माल त्या साताऱ्यातील शेतकऱ्यांकडून विकत घेतात. नोकरी करत करत तिघींनी सुरू केलेल्या या व्यवसायाची उलाढाल आता लाखांमध्ये पोहोचली आहे. 

या तिघीही बहिणी मुळच्या साताऱ्याच्या. त्यांच्या वडिलांची साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात शेती आहे. त्यामुळे अधूनमधून सुट्टीमध्ये त्याही शेतीमध्ये जायच्या. पुढे शिक्षणासाठी त्या पुण्यात स्थायिक झाल्या. मोठी बहीण पुजा मुळीक हीचे लग्न झाले असून आयटीमध्ये चांगल्या पदावर नोकरी करते. दुसऱ्या क्रमांकाची प्रणाली मुळीक वकील आहे तर लहान बहीण अनुजा मुळीक हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन पूर्णवेळ मिलेट्स कुकीज बनवण्याचं काम करते. त्यांना एक भाऊ असून तो परदेशात काम करतो.

तिघीही पुण्यात असल्यामुळे तिघींनी मिळून काहीतरी व्यवसाय करण्याचं त्यांनी ठरवलं अन् शोधाशोध सुरू केली. लहान बहिणीचे हॉटेल मॅनेजमेंट झालेले असल्यामुळे यासंदर्भातील काहीतरी व्यवसाय करावा असं त्यांनी ठरवलं होतं. मोठी बहीण पुजा आणि प्रणाली दोघीही नोकरी करत असल्यामुळे दोघींनीही पार्ट टाईम व्यवसायात मदत करायची असं ठरवलं.

अशी झाली सुरूवातपुजाच्या बाळासाठी ती बाजारात पौष्टिक पदार्थ शोधत होती, पण तिला बाळासाठी हवे तसे पदार्थ मिळत नव्हते. ती मिलेट्सचे पदार्थ शोधू लागली पण तेही तिला हवे तसे मिळाले नाही, म्हणून त्यांनी मिलेट्सपासून कुकीज म्हणजेच बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि साधारण सहा महिन्यापूर्वी हा व्यवसाय सुरू केला. 

भरडधान्यांचा वापरज्वारी, राळा, नाचणी, बाजरी या धान्यांपासून आपण भाकरीच खातो पण या तिघी बहिणी यापासून वेगवेगळ्या फ्लेवरचे कुकीज बनवतात.  यासाठी कोणतेही आणि भेसळयुक्त पदार्थांचा वापर केला जात नाही. या कुकीजमध्ये पूर्णपणे याच धान्यांचा वापर केला जातो.

कच्च्या मालाची खरेदी गावातूनकुकीज बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या कच्च्या मालाची खरेदी साताऱ्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जाते. यामध्ये ज्वारी, राळा, बाजरी, नाचणी या धान्यांचा सामावेश होतो. त्याबरोबरच गूळही साताऱ्यातीलच गुऱ्हाळघरातून खरेदी केला जातो. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळतो आणि यांनाही भेसळमुक्त धान्य मिळते. 

पारंपारिक पद्धतीने प्रक्रियाखरेदी केलेले धान्य साफ करून पारंपारिक पद्धतीने गिरणीतून दळून घेतले जाते. गोडवा येण्यासाठी साखरेचा वापर न करता काकवी किंवा सेंद्रीय पद्धतीने बनवलेल्या गुळाचा वापर केला जातो. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलयुक्त पदार्थाचा वापर केला जात नाही हे विशेष.

व्यवसाय वाढतोयमिलेट्स कुकीज संदर्भात जास्तीत जास्त लोकांमध्ये जागृती होण्यासाठी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला जातो. जशजशा ऑर्डर मिळत जातील त्याप्रमाणे माल बनवून दिला जातो. त्यामुळे माल खराब होण्याची शक्यता कमीच असते. सध्या या तिघींचा कुकीजचा व्यवसायाची उलाढाल ४ ते ५ लाखापर्यंत पोहोचली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमहिलासातारापुणे