Join us

दिल्लीच्या प्रजासत्ताकदिनी राज्यातील १० शेतकरी 'विशेष अतिथी', मराठवाड्यातील दोघे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 13:03 IST

मराठवाड्यातील कळंब तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा यात समावेश

शेती कसताना प्रयोगशीलतेची कास धरत आपली शेती इतरांसाठी 'मॉडेल' ठरवलेल्या राज्यातील दहा शेतकऱ्यांना दिल्ली येथील प्रजासत्ताकदिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दहामध्ये कळंब तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे.

२६ जानेवारी २०२४ रोजी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिन साजरा होणार आहे. याची जोरदार तयारी सुरू असतानाच कळंब तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या बातमीने आनंद व्यक्त केला जात आहे. यंदाच्या प्रजासत्ताकदिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून शेतकऱ्यांना स्थान राहणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 'प्रतिथेंब, अधिक पीक अर्थात सवन ड्रॉप, मोअर क्रॉप' या संकल्पनेतून सूक्ष्म जलसिंचनाचा वापर करत प्रभावी काम करणाऱ्या शेतकऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातील अशा दहा प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात तालुक्यातील देवधानोरा येथील बापूराव गजेंद्र नहाणे व एकुरका येथील श्रीकांत गोविंदराव भिसे या दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्याचे फलोत्पादन संचालक के. पी. मोते व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी याबाबत संबंधित शेतकऱ्यांना पत्राद्वारे कळवले आहे.

बापूराव नहाणे यांचे योगदान ....

शेती मातीतल्या प्रश्नावर सजग असलेल्या देवधानोरा येथील बापूराव नहाणे यांचे रेशीम शेतीवर मोठे काम आहे. शेतीत विविध प्रयोग करण्यासह त्यांनी तुती लागवड, रेशीम कोष उत्पादन, धागा निर्मिती यावर अनेकांना मार्गदर्शन केले आहे.

एमबीए फायनान्स ते प्रयोगशील शेतकरी

एकुरका तरुण शेतकरी श्रीकांत गोविंदराव भिसे हे एमबीए फायनान्स असे उच्च विद्याविभूषित आहेत. असे असतानाही ते काळ्या आईची सेवा करत शेतीत कायम नवप्रयोग करत आहेत. कमी पाण्यात, कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यात त्यांचा हातखंडा आहे.

तीन दिवसांचा दौरा, शासन यजमान

  • प्रजासत्ताकदिनी विशेष अतिथी म्हणून सपत्नीक निवड झालेले देवधानोऱ्याचे बापूराव नहाणे व त्यांच्या पत्नी सविता, एकुरक्याचे श्रीकांत भिसे व त्यांच्या पत्नी श्रीदेवी यांचा यासाठी २४ ते २६ असा दौरा राहणार आहे. 
  • याचे नियोजन व व्यवस्था करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त्त केले आहेत. त्यांना एसी थ्री टायर प्रवास, ९५० रुपये प्रतिदिन भत्ता व २ हजार २०० प्रतिदिन रहिवास भत्ता अनुज्ञेय राहणार आहे. पारंपरिक पोशाखात सहभागी व्हावे लागणार आहे
टॅग्स :प्रजासत्ताक दिनशेतकरीमराठवाडा