Join us

उसात पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढतोय? कसा कराल बंदोबस्त? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:37 IST

sugarcane white fly मागील काही वर्षात उसाची दुय्यम कीड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांढरीमाशी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात ऊसावर दिसून येत आहे.

मागील काही वर्षात उसाची दुय्यम कीड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांढरीमाशी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात उसावर दिसून येत आहे.

विशेषतः खोडवा उसावर या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो, या किडीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना ऊस उत्पन्नात मोठी घट झालेली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच ह्या किडीला ओळखून खालीलप्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. जेणेकरून किडीमुळे होणारे नुकसान वेळीच टाळता येईल.

किडीच्या उद्रेकाची संभाव्य कारणे१) शेतामध्ये पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत व पिकाला पाण्याचा ताण पडल्यास अशा दोन्ही परिस्थितीत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो.२) रासायनिक खताचा असमतोल वापर विशेषतः नत्रयुक्त खताचा कमी, अधिक आणि अवेळी वापर हा किडीसाठी पोषक वातावरण तयार करतो.३) प्रदीर्घ काळ हवेतील जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण व उष्ण हवामान अशा प्रकारच्या अनुकूल परिस्थितीत प्रजनन क्षमता वाढते आणि जीवनक्रम कमी कालावधीचा होतो. यामुळे किडींच्या संख्येत वाढ होण्यास मदत होते.४) पावसाळ्यात जास्त प्रमाणात पावसाची उघडीप किंवा खंड पडणे.५) लांब व रुंद पानाच्या जाती जास्त प्रमाणात बळी पडतात.६) खोडव्याचे व्यवस्थापन योग्य न करणे.

अनुकूल हवामानही कीड उष्ण आणि दमट परिस्थितीत जास्त प्रमाणात वाढते. विशेषतः २३-३० सेल्सिअस तापमान आणि मध्यम ते उच्च आर्द्रता त्यांच्या वाढीस अनुकूल असते. काही प्रयोगांती असे दिसुन आले आहे की, पाऊस जास्त झाल्यास पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी होते.   

नुकसानीचा प्रकार व प्रादुर्भावाची लक्षणे- या किडीची पिल्ले व प्रौढ दोन्ही पानातील रस शोषण करतात परंतु बाल्यावस्था पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते.- या अवस्थेत कीड पानाच्या मागील बाजूने स्थिर राहून पानातील रस शोषण करते, त्यामुळे पान निस्तेज होतात, पिवळी व गुलाबी पडतात आणि कालांतराने वाळू लागतात.- बर्‍याचदा किड तिच्या शरीरातून करीत असलेल्या चिकट गोड स्त्रावामुळे कॅप्नोडियम बुरशीची पानावर वाढ होऊन पाने काळी पडू लागतात व अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.- प्रादुर्भाव जास्त असल्यास एकाच पानावर ५,००० पर्यंत कोष आढळून येतात. पानाची मागची बाजू कोषामुळे पूर्णपणे काळी पडते.- या किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनात ८६% व साखरेच्या उताऱ्यात ३ ते ४ युनिट पर्यंत घट होऊ शकते.

पर्यायी खाद्य वनस्पतीविविध तृणधान्ये आणि गवतवर्गिय तणे

एकात्मिक व्यवस्थापनसदरिल किडीच्‍या व्यवस्थापनाकरिता लखनऊ येथील केंद्रीय ऊस संशोधन संस्था लखनऊ आणि पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांनी पुढील उपाय योजनाचा सल्‍ला दिला आहे.१) उसाची लागवड पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी, त्यामुळे कीडनाशकांची फवारणी किंवा धुरळणी करणे सोयीचे होईल.२) मार्च ते मे महिन्यात लागवड केलेल्या उसावर पांढरी माशी जुलै-ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात आढळते, म्हणून उसाची लागवड किंवा तोड उशिरा करू नये.३) पांढऱ्या माशीने प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.४) उसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे.५) नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये.६) खोडवा ऊसात खतांची मात्रा न दिल्यास ही कीड वाढते. त्यामुळे खोडवा उसाची काळजी घ्यावी. ७) उसाच्या शेंड्या जवळील दुसऱ्या व तिसऱ्या पानांवर ही कीड जास्त अंडी घात घालते अशी २ ते ३ पाने तोडून अंडी व कोषासह जमिनीत पुरून अथवा जाळून नष्ट करावीत.८) पांढऱ्या माशी ने प्रादुर्भावग्रस्त ऊस तुटल्यानंतर त्यामधील पाचट तसेच न ठेवता लवकरात लवकर नष्ट करावे म्हणजे अंडी, बाल्यावस्था व कोष मरतात.९) पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. सदरील सापळे वाऱ्याच्या दिशेने लावल्यास पांढऱ्या माशीचे प्रोढ आकर्षित होऊन चिकटतात त्यामुळे शेतातील पांढऱ्या माशीची संख्या कमी होण्यास मदत होते.१०) पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.११) लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.१२) रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस २० टक्के ३० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३ मिली किंवा ॲसीफेट ७५% २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.१३) इमिडाक्लोपीड १७.८% कीटकनाशकासोबत २ टक्के युरिया (२०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) मिसळून फवारणी केल्यास किडींच्या कोषामध्ये कीटकनाशकाचा प्रवेश चांगल्याप्रकारे होतो व त्यामुळे किडीचे अधिक चांगले व्यवस्थापन होते.१४) कीटकनाशकाच्या फवारणीनंतर १० ते १५ दिवस ऊस किंवा उसाचे वाढे जनावरांना घालू नये.

वरील किटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पावर पंपासाठी किटकनाशकाचे प्रमाण तीन पट करावे. आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.

पिकांमध्ये फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी१) फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी.२) वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये.३) फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.४) किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी.

डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगेकृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, परभणी02452-229000

टॅग्स :ऊसकीड व रोग नियंत्रणशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापन