Join us

Terrace Garden : टेरेस गार्डनच्या माध्यमातून फळे, भाजीपाला अन् ऑक्सिजनही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 15:46 IST

विषयुक्त अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला खायचा का? असा प्रश्न बरेचजण विचारू लागलो आहेत. त्यात फारसे गैर नाही. मात्र, फक्त प्रश्न विचारून चालणार नाही.

विषयुक्त अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला खायचा का? असा प्रश्न बरेचजण विचारू लागलो आहेत. त्यात फारसे गैर नाही. मात्र, फक्त प्रश्न विचारून चालणार नाही. तर त्यावर जालीम उपाय शोधायले हवेत. मी त्यावर उपाय शोधला तो म्हणजे टेरेस गार्डन, सांगली येथील घनशामनगरमधील माळ बंगला परिसरात मी राहतो.

ऋतुराज नावाचा माझा बंगला आहे. त्यामध्ये मी जाणीवपूर्वक एक हजार स्क्वेअर फुटांचा टेरेस ठेवला असून आणि चोहोबाजूंनी जागा ठेवली आहे. त्यामध्ये मी टेरेस गार्डनचा प्रयोग केला. मी शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रमुख होतो, त्यावेळी टेरेस गार्डनचे प्रयोग पाहिले होते.

एवढेच नव्हे, तर जागतिक परिषदेच्या निमित्ताने जर्मनी आणि फ्रान्स या देशात गेल्यानंतर त्या देशातील टेरेस गार्डनचे प्रयोग मला जवळून पाहता आले. मुळातच मी कृषी अर्थशास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे आणि राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये जवळपास २५ वर्षे कार्यरत असल्यामुळे टेरेस गार्डनची आवड निर्माण झाली.

आपल्या कुटुंबाला वर्षाकाठी किती भाजीपाला व फळे लागतात. आयुर्वेदिक झाडे किती असावीत याचा अभ्यास केला, किमान ५ फळांची झाडे तरी पाहिजेत. याचा विचार करून त्यामध्ये आंबा, चिकू, नारळ, लिंबू आणि डाळिंब झाडे लावली.

किमान १५० नारळ पाहिजेत. लागतात. १० डझन आंबे हवेत, डाळिंब, लिंबू आणि चिकू आपल्या किमान गरजा भागवू शकतात. मिरची, अळूची पाने, कढीपत्ता, अळू, गवती चहा असायलाच हवा. एवढेच नव्हे, तर आयुर्वेदिक पार्क तयार केले. त्यामध्ये तुळस, कोरपड, सब्जा लावला.

कोथिंबीर, पालक, मेथी, तांबडा माठ लावण्यासाठी विदेशातून आयात होणाऱ्या मिशनरी त्यासाठी वापरलेले प्लास्टिकच्या जाड क्रेट वापरले. त्यामध्ये भाजीपाला पिकवतो. विशेष म्हणजे ठिबक सिंचन योजनेचा अवलंब केला आहे. त्याबरोबरच सेंद्रिय खताचा वापर करतो.

शेणखत, निंबोळी खत महत्त्वाचे असे असले तरी आम्ही फळे, भाजीपाला याबाबतीत पूर्ण स्वावलंबी आहोत असे नाही. माझी पत्नी सुवर्णा हिची मोलाची साथ आहे.

तुळस, कोरफड टेरेसवरील ऑक्सिजन पार्कमध्ये आम्ही सकाळी प्राणायाम आणि योगासने करून व विषमुक्त फळे व भाजीपाला खाऊन तंदुरुस्त आहोत हे काय कमी आहे का?

प्रा. संजय ठिगळेसांगली

टॅग्स :गच्चीतली बागभाज्याफळेठिबक सिंचनफलोत्पादन