Join us

आता कोकणातही ऊस येणं शक्य पण त्यासाठी कशी कराल लागवड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 1:26 PM

कोकणातील जमीन व हवामान पिकाला योग्य असल्याने शेतकरी ऊसलागवडीकडे वळले आहेत. खरीप हंगामातील भात पिकाची कापणी झाल्यानंतर जमिनीतील योग्य ओलावा असताना लागवड सुलभ होत आहे.

कोकणातील जमीन व हवामान पिकाला योग्य असल्याने शेतकरी ऊसलागवडीकडे वळले आहेत. खरीप हंगामातील भात पिकाची कापणी झाल्यानंतर जमिनीतील योग्य ओलावा असताना लागवड सुलभ होत आहे.

जमिन व पूर्वमशागतलागवडीसाठी जमीन २५ ते ३० सेंटिमीटर खोल नांगरावी आणि त्या स्थितीत किमान १५ दिवस तापू द्यावी. यानंतर ढेकळे फोडून जमीन तयार करावी. दुसरी नांगरट सुरू उसाच्या लागणीपूर्वी एक महिना आणि पहिल्या नांगरणीच्या विरुद्ध दिशेने करावी. या नांगरणीच्या वेळी उसाला द्यावयाच्या हेक्टरी ५० गाड्यांपैकी २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे, म्हणजे मातीत चांगले मिसळेल, ट्रॅक्टरच्या साहाय्याने रीजरने ९० सेंटिमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. उरलेले शेणखत लागवडीपूर्वी सऱ्यांमध्ये सारखे पसरवून टाकावे. जमिनीच्या उतारानुसार सऱ्यांची लांबी ठेवून आडवे बांध व पाट पाडावेत.लागवडीसाठी जातीविद्यापीठाने सुरू हंगामासाठी उसाच्या को-७४०, को.एम.-७१२५ (संपदा), को-७२१९ (संजीवनी) आणि को- ७५२७, को-९२०००५, को-८६०३२ या जातींची शिफारस केली आहे.

लागवडीचा कालावधी व पद्धतीकोकणात सुरू उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत केली जाते. लागवड सरी वरंबा पद्धतीने करावी. या पद्धतीत मुख्यतः ओली व कोरडी लागवड असे दोन प्रकार आहेत. ओली लागवड मध्यम ते हलक्या जमिनीत करतात. या पद्धतीत सर्वांत प्रथम पाणी सोडून जमीन चांगली भिजल्यावर तीन डोळ्यांच्या कांड्या २.५ ते ५ सेंटिमीटर खोलीपर्यंत पायाखाली दाबून लावाव्यात व कांडीवरील डोळे जमिनीच्या बाजूस राहतील याची दक्षता घ्यावी.

भारी जमिनीसाठी कोरडी लागवड पद्धत अवलंबिली जाते. या पद्धतीत प्रथम सरीमध्ये चर खोदून २.५ ते ५ सेंटिमीटरपर्यंत खोल बेणे मांडून मातीने झाकून नंतर सच्या पाण्याने भिजवतात. कोकणात बहुतांश जमिनीत ओली लागवड करता येते. उसाची लागवड रोपे एक डोळा पद्धतीने माती व शेणखत समप्रमाणात वापरून किंवा कोकोपीट आणि गांडूळ खत समप्रमाणात घेऊन ५ ग्रॅम अॅझेटोबॅक्टर जिवाणू संवर्धक प्रति किलोग्रॅम मिश्रणाच्या प्रमाणात वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.

अधिक वाचा: उसाचे उत्पादन वाढवायचं; आंतरपीक म्हणून घ्या भुईमूग

आंतरपिके फायदेशीरउसामध्ये कमी कालावधीत तयार होणारी आंतरपिके घेता येतात. मुळा, लाल माठ, गवार, काकडी, कोथिंबीर इत्यादी पिके घेतली असता उसाच्या उत्पन्नावर अनिष्ठ परिणाम न होता अतिरिक्त उत्पन्न मिळते. ऊस-मधुमका आंतरपीक पद्धतीमध्ये उसाची लागवड ६० सेंटिमीटर बाय ६० सेंटिमीटर - १२० सेंटिमीटर अंतरावर जोड ओळ पद्धतीने करून दोन जोड ओळीमध्ये ४५ सेंटिमीटर अंतरावर दोन ओळी मधुमका पिकाची लागवड करावी. जानेवारी महिन्यात केलेल्या लागवडीच्या उसाला जानेवारी ते मे या कालावधीत ९ ते १० दिवसांच्या अंतराने १५ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात.

टॅग्स :ऊसपीकपीक व्यवस्थापनशेतकरीकोकणसेंद्रिय खतखतेशेती