आपली संपत्ती आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांना आणि कायदेशीर वारसांना विनासायास हस्तांतरित करणे हे वारसाहक्क नियोजनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
आपल्या कष्टाच्या कमाईचा ताबा कोणाकडे असावा हे ठरवण्याचा कायदेशीर अधिकार केवळ मृत्युपत्राद्वारेच मिळतो.
जर मृत्युपत्र नसेल, तर तुमच्या मालमत्तेचे वाटप तुमच्या इच्छेनुसार नव्हे, तर उत्तराधिकार कायद्यानुसार होते, ज्यामध्ये अनेकदा कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्यता असते.
आपल्या समाजात मृत्युपत्र या विषयावर बोलणे अनेकदा 'अशुभ' मानून टाळले जाते; परंतु वास्तवात प्रत्येकाने आपल्या वयाचा विचार न करता, आपल्या संपूर्ण आर्थिक नियोजनाचा एक अनिवार्य आणि अविभाज्य भाग म्हणून मृत्युपत्र तयार करणे अत्यंत गरजेचे आहे.
मराठी संस्कृतीत एकत्र कुटुंबपद्धतीला मोठे महत्त्व दिले जाते, मात्र स्पष्ट मृत्युपत्र नसेल तर याच नात्यांमध्ये कायमची भिंत उभी राहू शकते.
वडिलांनी कष्टाने उभ्या केलेल्या वास्तूवरून मुलांमध्ये होणारे वाद हे केवळ आर्थिक नसून ते संपूर्ण कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे ठरतात.
मालमत्तेचे वाद एकदा का न्यायालयात गेले की, ते निकाली निघण्यास अनेक वर्षे लागतात. त्यात कुटुंबाचा मौल्यवान वेळ आणि पैसा खर्च होऊन पुढच्या पिढीला विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो.
अशा परिस्थितीत एका स्पष्ट आणि कायदेशीर मृत्युपत्रामुळे हा संभाव्य विलंब आणि कटू संघर्ष सहज टाळता येतो.
आजच्या डिजिटल युगात मृत्युपत्र तयार करण्यासाठी वकिलांच्या चकरा मारण्याची गरज उरलेली नाही, कारण अनेक नामांकित संस्था आणि बँका आता ऑनलाइन मृत्युपत्र तयार करण्याची सोय उपलब्ध करून देतात.
ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे दिल्यावर एक कायदेशीर मसुदा तयार होतो. मात्र, ऑनलाइन प्राप्त होणारा दस्तऐवज हा केवळ एक मसुदा असतो.
त्याची प्रिंट काढून त्यावर स्वतःची स्वाक्षरी करणे आणि दोन साक्षीदारांच्या सह्या घेणे आजही अनिवार्य आहे, कारण केवळ डिजिटल फाइलला मृत्युपत्र म्हणून कायदेशीर मान्यता मिळत नाही.
मृत्युपत्राची अंमलबजावणी करताना गोपनीयता राखण्यासाठी ते एका 'शिक्कामोर्तब पाकीट' मध्ये सुरक्षित ठेवता येते. तसेच तुमच्या इच्छेनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एका विश्वासू व्यक्तीची 'कार्यवाहक' म्हणून निवड करणे श्रेयस्कर ठरते.
योग्यरीत्या तयार केलेले मृत्युपत्र हे वारसांना मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी लागणारा वेळ आणि कायदेशीर गुंतागुंत कमी करण्यास मदत करते.
तुमची सर्व मालमत्ता, जसे की शेअर्स, म्युच्युअल फंड, विमा आणि बँक खाती, मृत्युपत्रातील तरतुदींशी आणि वारसदारांच्या गरजांशी सुसंगत आहेत की नाही, याची खात्री करण्यासाठी सल्लागाराची मदत घेतली जाऊ शकते.
सल्लागार मालमत्तेवर आधारित करनियोजन सुचवतात, ज्यामुळे वारसांना जास्तीत जास्त लाभ मिळतो.
लग्न, घटस्फोट किंवा अपत्यप्राप्ती यांसारख्या जीवनातील महत्त्वाच्या बदलांनंतर मृत्युपत्र आणि वारसदारांची नावे अद्ययावत करण्यासाठी, तसेच अल्पवयीन मुलांसाठी संपत्तीचे नियोजन करण्यासाठी सल्लागाराचे मार्गदर्शन मोलाचे ठरते.
शेवटी, निवृत्तीनंतरचे सुखी आयुष्य म्हणजे केवळ पैसा साठवणे नव्हे, तर आपल्या पश्चात कुटुंबात राहणारी शांतता होय. तुमच्या आयुष्याची ही महत्त्वाची कागदपत्रे आजच पूर्ण करा आणि तुमच्या कुटुंबाला संघर्षाऐवजी सुखाचा आणि प्रेमाचा वारसा द्या.
मृत्युपत्र करताना लक्षात ठेवा◼️ मानसिक सक्षमता, दबाव-बळजबरी, बनावट स्वाक्षरी, कायदेशीर प्रक्रियेतील त्रुटी यामुळे मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते.◼️ मृत्युपत्र करताना नोंदणीकृत डॉक्टरांकडून 'मानसिक स्थिती उत्तम' असल्याचा दाखला जोडणे, मृत्युपत्र वाचताना, त्यावर स्वाक्षरी करतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे यामुळे मृत्युपत्राची विश्वासार्हता वाढते.◼️ मृत्युपत्राची नोंदणी ही कायदेशीर अट नसून ऐच्छिक पर्याय आहे. नोंदणी न केलेले मृत्युपत्रही कायदेशीररीत्या वैध असते; परंतु नोंदणीमुळे त्याची विश्वासार्हता सिद्ध करणे सोपे होते.◼️ नैसर्गिक वारसाला संपत्तीतून वगळत असाल, तर त्याचे स्पष्ट, तर्कसंगत कारण नमूद केल्यास भविष्यात त्या निर्णयाला आव्हान देणे कठीण होते.
अमोल साळेअर्थ सामाजिक विषयांचे अभ्यासक
अधिक वाचा: राज्यात 'ह्या' महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांना मिळणार चौपट नुकसानभरपाई; लवकरच खात्यावर पैसे
Web Summary : A will ensures your assets transfer smoothly to loved ones, preventing family disputes and legal battles. It's crucial for financial planning, offering control over your estate and safeguarding your family's future. Online options simplify creation, but signatures and witnesses remain essential for legal validity.
Web Summary : वसीयत यह सुनिश्चित करती है कि आपकी संपत्ति प्रियजनों को आसानी से हस्तांतरित हो, जिससे पारिवारिक विवाद और कानूनी लड़ाईयां टलती हैं। यह वित्तीय योजना के लिए महत्वपूर्ण है, जो आपकी संपत्ति पर नियंत्रण प्रदान करती है और आपके परिवार के भविष्य की रक्षा करती है। ऑनलाइन विकल्प निर्माण को सरल बनाते हैं, लेकिन कानूनी वैधता के लिए हस्ताक्षर और गवाह आवश्यक हैं।