Vegetbale Farming : वेलवर्गीय भाजीपाला फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी फुले येण्याच्या काळात 'क्यू ल्यूर' कामगंध सापळे एकरी ५ या प्रमाणात मंडपात लावावेत.
फळांची काढणी योग्य पक्वतेस करावी. प्रादुर्भावग्रस्त फळांमधून फळमाशीची उत्पत्ती वाढत असल्याने अशी फळे गोळा करून नष्ट करावीत. वेलांखालील माती वेळोवेळी हलवून घ्यावी.
कारली, पडवळ, दुधी भोपळा, दोडका या पिकांवर तांबडे भुंगेरे, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
रोग नियंत्रण
- काळा करपा, केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी अमिटोक्ट्रॅडीन (२७%) + डायमिथोमॉर्फ (२०.२७% एससी) २ मिली किंवा बेनालॅक्सिल (४%) + मॅन्कोझेब (६५% डब्लूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- आवश्यकतेनुसार पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने करावी. भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल १ मि.ली. किंवा मेप्टिलडीनोकॅप ०.७ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय सेवा केंद्र, इगतपुरी
