Bhajipala Management : वेलवर्गीय भाज्या (Velvargiy Bhajya) उदा. कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी, पडवळ या पिकांना वाढीच्या काळात आधार दिल्यास त्यांची वाढ चांगल्याप्रकारे होते. त्यासाठी मंडप किंवा ताटी पद्धती वापरून वेलींना आधार दिला जातो. नेमकं हे आधार व्यवस्थापन कसे करायचे, जाणून घेऊया सविस्तर....
वेलवर्गीय भाजीपाला पिके आधार व्यवस्थापन
दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळविण्याकरिता वेलींना मंडप किंवा तारेच्या साह्याने वाढविणे गरजेचे असते. आधार दिल्यामुळे नवीन येणाऱ्या फुटींना वाढीसाठी सतत चांगला वाव मिळत राहतो. त्यामुळे फळधारणा चांगली होते. याउलट जमिनीवर पहिले काही फुटवे आल्यानंतर नवीन फुटवे येत नाहीत आणि वेली केवळ एकदाच फळे देतात.
मंडपावर चढविलेल्या वेली ६ ते ७ महिने चांगल्या राहतात, तर जमिनीवर केवळ ३ ते ४ महिनेच चांगल्या राहतात.. मंडपावर किंवा ताटीवर फळे लोंबकळत राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश एकसोरखा मिळत असल्यामुळे फळांचा रंग एकसारखा आणि चांगला राहतो. फळांचा जमिनीसोबत संपर्क होत नाही. त्यामुळे ओलावा लागून फळ सडण्याचा धोका टाळला जातो.
शिवाय कीड व रोगांचे प्रमाणही कमी राहते. फळांची तोडणी, रासायनिक फवारणी ही कामे करणे सुलभ होते. आंतरमशागतीवरील खर्च कमी होतो. वेल मंडपावर पोहोचेपर्यंत दीड ते दोन महिन्यांचा कालावधी जातो. या काळात या पिकांमध्ये पालेभाज्यांसारखी मिश्रपिके घेता येतात.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी