Join us

Tur Crop Management : तीन प्रकारच्या बुरशीपासून तूर पिकाचे संरक्षण कसे कराल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 19:48 IST

Tur Crop Management : भाऊसाहेब मोटे यांच्या शेतातील प्रादुर्भावग्रस्त तूर पिकाचा नमुना विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रात आणला होता.

Tur Crop Management :    राज्यातील बहुतांश भागात पाऊस सुरूच आहे. काही जमिनीत निचरा लवकर होतो तर भारी काळया जमिनीत पाण्याचा निचरा लवकर होत नाही. शिवाय सतत रिमझिम पावसामुळे जमीन ओली असते. अशा जमिनीत तूर पिकावर खोडावर मुळावर फायटोप्थोरो या हानिकारक बुरशीचा प्रादुर्भाव होत असतो. अशा वेळी शेतकऱ्यांनी त्वरित बुरशीनाशक आळवणी करावी, असे आवाहन डॉ दिलीप हिंगोले यांनी केले. 

छत्रपती संभाजीनगर शहराला लागून असलेल्या कांचनवाडी येथील भाऊसाहेब मोटे यांनी त्यांच्या शेतातील प्रादुर्भावग्रस्त तूर पिकाचा नमुना विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रात आणला होता. त्या नमुन्याचे पाहणी करत डॉ. दिलीप हिंगोले यांनी हा फायटोप्थोरा या बुरशीचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे तूर पिकावर आळवणी करावी. 

  • मेटालक्झिल एक ग्रॅम एक लिटर पाण्यात (100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम) घेऊन द्रावण तयार करत पिकाच्या मुळाभोवती आळवणी करावी. 
  • बुंध्यावर देखील द्रावण पडेल याची काळजी घ्यावी. 
  • किंवा रेडोमिल अडीच ग्रॅम एक लिटर पाण्यात घेऊन आळवणी करावी (100 लिटर पाण्यात 250 ग्रॅम) 
  • अथवा
  • जैविक बुरशीनाशक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ निर्मित बायोमिक्स याचा एकरी चार लिटर या प्रमाणे उपयोग करावा. 
  • तीनशे लिटर पाण्यात 4 लिटर बायोमिक्स हे बुरशीनाशक किडनाशक घेत पिकावर आळवणी करावी. 

दुसरी बुरशीचे नियंत्रण 

यानंतर दुसरी बुरशी म्हणजे मायक्रोफोमिना या हानीकारक बुरशीचा प्रदूभाव पुढील म्हणजे सप्टेंबर महिन्यात होत असतो. याची लक्षणे म्हणजे तूर पिकाच्या फांदीवर काळे चट्टे पडतात आणि नंतर पिक वाळून जाते. अशावेळी अगोदर साफ या बुरशी नाशकचा फवारणी करावी. 

तिसरी बुरशीचे नियंत्रण 

तिसरी जी बुरशी या पिकावर येते, ती पिकाला शेंगा आल्यानंतर येते. या बुरशीचे नाव फ्युजिरियम असे आहे. ही येण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे जमिनीत ओलीचा अभाव असल्यावर येते, म्हणून पिकाला शेंगा लागतेवेळी जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी तूर पिकाचे या तीन बुरशीपासून संरक्षण करावे. 

दुसरा जैविक उपाय म्हणजे तूर पिकास जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात ट्रायकोड्रमा अथवा बायोमिक्स याचा एकरी चार लिटर वापर करावा. यामुळे तुमच्या जमिनीतील हानिकारक बुरशी कमी होतील. त्यामुळे तूर पिकाचे सरक्षण होईल, याचा वापर मात्र जमिनीत ओल असताना करावा. कोरड्यात करू नये. 

- रामेश्वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, छत्रपती संभाजी नगर

टॅग्स :तुराशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनकृषी योजना