Join us

कमी दिवसांत चांगलं उत्पन्न देणारी तिळाची शेती, लागवडीपासून ते काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:19 IST

Til Lagvad : तीळ पिकाचे सुधारित तंत्रज्ञान वापरून लागवड केल्यास उत्पादन वाढण्यास मोठा वाव आहे.

Til Lagvad : तीळ हे प्राचीन कालावधी पासून घेण्यात येत असलेले महत्त्वाचे तेलबिया पिक आहे. तिळाच्या बियाण्यात सर्व साधारणपणे तेलाचे प्रमाण ५० टक्के आणि प्रथिनांचे २५ टक्के असते. तिळाचे तेल त्यामधील ज्वलन विरोधक घटक (सिसमोल आणि सिसँमोलीन) मुळे दीर्घकाळ चांगले टिकून राहते आणि खवट होत नाही. तेल काढल्यानंतर उरलेल्या पेंडीत प्रथिने (३५-४५ टक्के) असतात. 

तसेच कॅल्शियम व फॉस्फरस हे खनिज पदार्थ विपुल प्रमाणात असल्याने तीळ जनावरांचे व कोंबडीचे उत्तम खाद्य म्हणून वापरता येते. कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे तीळ पिक आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामात सन २०२२-२३ मध्ये तीळ पीक ०.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर घेण्यात आले होते व त्यापासून उत्पादन ०.१६ लाख टन मिळाले होते आणि तिळीची उत्पादकता २५६ किलो प्रती हेक्टरी एवढी कमी होती.  

खरीपातील तीळ पिक ८५ ते ९० दिवसात (कमी कालावधीत) येत असल्याने दुबार पिक पद्धतीसाठी योग्य ठरते. मागील तीन वर्षाचे लागवडी खालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता विषयी अवलोकन केले असता महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात क्षेत्रफळ  आणि उत्पादकता वाढतांना दिसत असुन बाजारपेठेत तिळीला उच्च भाव मिळत आहे. म्हणून तीळ पिकाचे सुधारित तंत्रज्ञान वापरून लागवड केल्यास उत्पादन वाढण्यास मोठा वाव आहे.

हवामान       बियाण्याच्या चांगल्या उगवणीसाठी किमान तापमान १५ अंश सेल्सिअस तर पिकांच्या कायिक वाढीसाठी २५-२७ अंश सेल्सिअस तापमान लागते. फुल व फळ धारणासाठी २६-३२ अंश सेल्सिअस तापमानात पिकाची चांगली वाढ होते. तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास फुलगळ होते.

जमीन :      तीळ पिक विविध प्रकारच्या जमिनीत येत असले तरी सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली होते. वाळू मिश्रित पोयटाच्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास देखील हे पिक चांगले येते. जमिनीचा सामू जवळपास (५.५ ते ८.५) इतका असावा. निचरा न होणाऱ्या पाणथळ जमिनीत तिळाचे पिक चांगले वाढत नाही म्हणून या पिकास अशा प्रकारची जमीन निवडू नये. पूर्व मशागत :       तिळाचे बियाणे बारीक असते. तसेच तिळाच्या झाडाची सुरवातीची वाढ फार हळू होते. म्हणून जमिनीची पूर्वमशागत चांगली करून पृष्ठभागाचा थर सपाट, घट्ट व मऊ करावा लागतो. तीळ पिकाची पेरणी करण्यासाठी एक नांगरट व दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी. पावसाचे पाणी एकाच ठिकाणी साठून राहू नये तसेच बियाण्यांची उगवण चांगली होण्यासाठी जमिनीवर फळी फिरवून जमीन सपाट करून घ्यावी.

सुधारित वाण : फुले तीळ नं. १ : पांढरा टपोरा दाणा, अर्ध रब्बी हंगाम सोडून संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस,कालावधी (९०-९५ दिवस), ५००-६०० उत्पादन (किलो/हे.)तापी (जे.एल.टी. ७) : पांढरा दाणा, खान्देश व मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील क्षेत्र, कालावधी (८०-८५ दिवस) ६००-७०० उत्पादन (किलो/हे.)पदमा (जे.एल.टी. २६) : फिक्कट तपकिरी दाण्याचा रंग, लवकर येणारी व दुबार पिक लागवडीस योग्य जळगाव, धुळे, बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील तिळीचे क्षेत्र, कालावधी (७२-७८ दिवस), ६५०-७५० उत्पादन (किलो/हे.)जे.एल.टी. ४०८ : पांढरा टपोरा दाणा, मध्यम कालावधीत अधिक उत्पादनक्षम, तेलाचे प्रमाण जास्त, हमखास पाऊस पडणाऱ्या खान्देश व लगतच्या विदर्भ, मराठवाडा विभागातील क्षेत्राकरिता खरीप हंगामासाठी. कालावधी (८१-८५ दिवस), ७५०-८०० उत्पादन (किलो/हे.)फुलेपूर्णा (जे.एल.टी. ४०८- २) : पांढरा टपोरा दाणा, मध्यम कालावधीत अधिक उत्पादनक्षम, तेलाचे प्रमाण जास्त, खान्देश व लगतच्या विदर्भ विभागातील क्षेत्राकरिता उन्हाळी हंगामासाठी शिफारस.कालावधी (८४-९७ दिवस), ७००-८०० उत्पादन (किलो/हे.)टी.एल.टी.१० : पांढरा टपोरा दाणा, मध्यम कालावधीत अधिक उत्पादनक्षम, तेलाचे प्रमाण जास्त, मराठवाडा व लगतच्या विदर्भ विभागातील क्षेत्राकरिता  रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी शिफारस.कालावधी (८७-९७ दिवस), ७००-८०० उत्पादन (किलो/हे.)एकेटी १०१ : पांढरा टपोरा दाणा, मध्यम कालावधीत अधिक उत्पादनक्षम, तेलाचे प्रमाण जास्त, खान्देश व लगतच्या विदर्भ विभागातील क्षेत्राकरिता उन्हाळी हंगामासाठी शिफारस.कालावधी (८४-९० दिवस), ७००-८०० उत्पादन (किलो/हे.)

बियाणे व बीजप्रक्रिया :       पेरणीसाठी उत्तम प्रतीचे २.५ ते ३.० कि.ग्रँ. प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. बियाण्यापासून व जमिनीमधून उद्भवणारे बुरशीजन्य रोग होऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा ५ ग्रँम प्रति किलो बियाण्यास चोळावे व त्यानंतर अँझोटोबँक्टर २५ ग्रँम प्रति किलो बियाण्यास लावावे.

पेरणी :       खरीप हंगामात तिळाची पेरणी मृगाचा चांगला पाऊस झाल्यावर आणि योग्य वापस आल्यावर म्हणजेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. पेरणी ३० से.मी. अथवा ४५ से.मी. अंतरावर पाभरीने करावी. पाभरीने पेरणी करतांना बारीक वाळू अथवा चाळून घेतलेल्या गांडूळखत किंवा शेणखतात मिसळून पेरल्याने बियाण्याचे वितरण प्रमाणशीर होऊन एकसारख्या अंतरावर पडते. २.५ से.मी. पेक्षा जास्त खोलीवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होतो. विरळणी :       तीळ पिकामध्ये विरळणी अतिशय महत्वाची असते. पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी पहिली विरळणी व १५ ते २० दिवसांनी दुसरी विरळणी करावी. पिकाच्या योग्य वाढीसाठी व अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी २.२२ लाख रोप संख्या आवश्यक आहे. त्यासाठी पेरणी ४५ से.मी. अंतरावर असल्यास विरळणी ओळीतील दोन रोपातील अंतर १० से.मी. ठेवून करावी. पेरणी ३० से.मी. अंतरावर केली असल्यास विरळणी १५ से.मी. अंतर ठेवून करावी.

खत व्यवस्थापन :       शेवटच्या कुळवणीच्या वेळी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर ३ आठवड्यांनी नत्राचा अर्धा हप्ता (२५ किलो नत्र) देऊन पाणी द्यावे.

आंतरमशागत :      रोप अवस्थेत हे पिक नाजूक असल्याने ते तणांबरोबर जमिनीत ओलावा व अन्नद्रव्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे तिळाचे क्षेत्र तणविरहीत ठेवावे. झाडाच्या तंतूमुळ्या जमिनीच्या पृष्ठभागावर वाढत असल्यामुळे खोल आंतरमशागत केल्यास मुळांना इजा होते. म्हणून पिक लहान असतांनाच आंतरमशागत करावी. त्यासाठी पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली निंदणी व कोळपणी आणि पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी दुसरी निंदणी व कोळपणी करावी. आंतरमशागतीमुळे तणांचे नियंत्रण होतेच त्याशिवाय पाणी जमिनीत व्यवस्थित मुरते व जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होऊन पिक जोमदार वाढते.

पाणी व्यवस्थापन :       खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर तीळ पिक येते. परंतु आवश्यकता भासल्यास पिकाच्या नाजूक अवस्थेत पाणी देणे जरुरीचे आहे. मुख्यतः फुले येण्याच्या कालावधीत व बोंड्या भरण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. उन्हाळी हंगामात जरुरीप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. उन्हाळी हंगामात तीळ पिकाला सरासरी ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 

पीक संरक्षण :       साधारणपणे किडी व रोगांमुळे  पिकाचे २०-३५ टक्के नुकसान होते. पिकावर प्रामुख्याने पाने गुंडाळणारी/ फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव होतो. तसेच रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, पांढरी माशी चा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो.  तीळ पिकावर पाने गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव नियमितपणे दिसुन येतो. या किडीचे पतंग कोवळ्या पानावर अंडी घालतात. अळी पानांची गुंडाळी करून आतील भाग खाते. फुले आल्यानंतर फुलातील भाग खाते व बोंडे लागल्यानंतर छिद्र पाडून आतील भाग खाते. तसेच तीळ या पिकावर तुडतुडे, कोळी व पांढरी माशी या पानांतील रस शोषून घेणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव देखील होतो. त्याशिवाय तुडतुडे, मायकोप्लाझमा सारख्या विषाणूंचा प्रसार करतात. त्यामुळे पर्णगुच्छ हा रोग होतो. पांढरी माशी निकोशियाना १० (टी.एम.व्ही. १०) विषाणूचा प्रसार करतात त्यामुळे पाने खाली मुरडतात.

कीड नियंत्रणाचे उपाय वेळेवर पेरणी करावी.किडग्रस्त झाडे/झाडांचे भाग तोडून/अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.निंबोळी अर्काची (५ टक्के) पेरणीनंतर १५ दिवसांनी फवारणी करावी.क्विनाँलफॅास (२५ ईसी) १००० मिली प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर ३०, ४५ व ६० दिवसांनी फवारणी करावी.

प्रमुख रोग : पानावरील ठिपके - हा रोग तीळ पिकावर नियमित आढळून येतो. पानावर अल्टरनेरिया बुरशीचे फिक्कट तांबट ठिपके गोलाकार/ अनियमित आकाराने असतात. नंतर त्यांची संख्या व आकार वाढत जावून एकमेकांत मिसळतात व पाने गळतात. पानांवर सरकोस्पोरा बुरशीचे कोनीय आकाराची तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.

मुळ व खोड कुजव्या - या रोगामुळे सुरुवातीस तिळाचे खोड जमिनीलगत तांबडे पडते. खोडावर काळसर पुरळ दिसतात व वर पसरतात. खोड चिरले जाऊन झाड जमिनीपासून १ ते १.५ फुटावर कोलमडते. खोडाची व मुळाची साल काढून पाहिल्यास साली खाली काळसर बुरशीची वाढ दिसुन येते.

मर - हा रोग कोलिटोट्रायकम व फुयजॉरीयम बुरशीमुळे होतो. बुडापासून शेंड्यापर्यंत झाड काळसर तपकिरी दिसते. झाडांवरील बोंडे पक्व होण्यापूर्वी झाडे मरतात.

पर्णगुच्छ - हा रोग मायकोप्लाझमा सारख्या विषाणूंमुळे होतो. रोगाचा प्रसार तुडतुडे मार्फत होतो. जोपर्यंत पिक फुलोऱ्यात येत नाही तोपर्यंत या गोराची लक्षणे दिसुन येत नाहीत. पिक फुलोऱ्यात असतांना फुलांचे रुपांतर बारीक पानात होऊन त्याचा गुच्छ तयार होतो.

भुरी - झाडाच्या पानावर पांढरी भुकटी पसरल्यासारखी दिसते. पाने पिवळसर होऊन गळतात.

रोग नियंत्रणाचे उपाय : पेरणीसाठी रोगाची बाधा न झालेले उत्तम प्रतीचे बियाणे वापरावे व बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.पिकाची फेरपालट करावी.प्रतिकारक जातीचा वापर करावा.डायथेन एम-४५, १२५० ग्रँम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड १५०० ग्रँम ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारणी करावी.भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी २० किलो ३०० मेष गंधकाची धुरळणी किंवा विरघळणारे गंधक १२५० ग्रँम ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारणी करावी.रोगग्रस्त झाडे/ झाडांचे भाग तोडून नष्ट करावेत.

काढणी व मळणी :       पिक पक्व झाल्यावर बियाण्यांची गळ होऊन होणारे नुकसान टाळण्यासाठी झाडावरील साधारणपणे ७५ टक्के पाने/ बोंड्या पिवळसर दिसू लागल्यावर पिकाची कापणी करावी. कापणी झाल्यावर पेंढ्या बांधाव्यात. सहा ते आठ पेंढ्यांची खोपडी करून उन्हात चांगली वाळू द्यावी. त्यानंतर पेंढ्या ताडपत्रीवर हाताने/काठीने उलट्या करून झाकाव्यात. बियाणे उफणणी करून स्वच्छ करावे व चांगले वाळवावे. अशा रीतीने सुधारित तंत्र वापरून तीळ लागवड केल्याने तीळीचे सलग पिक घेतल्यास प्रती हेक्टरी ६ ते ७ क्विंटल उत्पादन मिळते.

- डॉ. एस. डी. राजपूत (तीळ पैदासकार)तेलबिया संशोधन केंद्र, म. फु. कृ. वि., जळगाव-४२५ ००१संपर्क क्रमांक: ९४०५१३८२६९

English
हिंदी सारांश
Web Title : Sesame Farming: Maximize Yield and Profit in a Short Time

Web Summary : Sesame farming offers quick returns. Optimal conditions include well-drained soil and temperatures between 25-32°C. Use improved varieties, apply proper fertilization, and manage pests for higher yields. Harvesting at the right time is crucial.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीपीक व्यवस्थापन