Join us

Soyabean Farming : सोयाबीनच्या उत्पादनात घट टाळायची असल्यास 'या' किडींचे नियंत्रण करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 20:43 IST

Soyabean Farming : शेतकऱ्यांनी किडींची योग्य ओळख करून वेळीच नियंत्रण उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

Soyabean Farming : अनुकूल हवामानामुळे सध्या सोयाबीन पिकावर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी किडींची योग्य ओळख करून वेळीच नियंत्रण उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रमुख खोड पोखरणाऱ्या किडी व त्यांचे नियंत्रण

खोडमाशीकाळ्या रंगाची मादी माशी पानावर व देठावर फिकट पिवळसर अंडी घालते. अंड्यातून निघालेली पांढऱ्या रंगाची पाय नसलेली अळी खोडात छिद्र करून आतील भाग पोखरते. रोपावस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पिकाची पुनः पेरणी करावी लागण्याची शक्यता असते.

उपाययोजना : 

  • पेरणीपूर्वी बियाण्याची थायमेथोक्झाम ३०% एस.एस. ने बीज प्रक्रिया करावी.
  • दरवर्षी जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या क्षेत्रात फोरेट १०% दाणेदार १० कि.ग्रा./हे. पेरणीपूर्वी द्यावे.
  • फवारणीसाठी एथिऑन ५० ई.सी. १५-३० मि.ली. किंवा क्लोरट्रेनिलीप्रोल १८.५ एस.सी. ३ मि.ली./१० लि. पाणी वापरावे.

चक्रभुंगा

मादी भुंगा देठ/फांदीवर दोन चक्रकाप करून अंडी घालते. अळी खोड पोखरून पोकळ करते. यामुळे शेंगा धरणे, दाण्यांची संख्या व वजन ५०% पर्यंत कमी होऊ शकते.

उपाययोजना : 

  • फुलोऱ्यापूर्वी ३-५ चक्रभुंगा/मीटर ओळ आढळल्यास तात्काळ फवारणी करावी.
  • प्रोफेनोफॉस ५० ई.सी. २० मि.ली. किंवा थायक्लोप्रिड २१.७ ए.सी. १५ मि.ली. किंवा ट्रायझोफॉस ४०% १२.५ मि.ली. किंवा एथिऑन ५० ई.सी. १५-३० मि.ली. किंवा क्लोरट्रेनिलीप्रोल १८.५ एस.सी. ३ मि.ली./१० लि. पाणी वापरावे.

महत्त्वाच्या सूचना

  • कीटकनाशकांचा वापर करण्यापूर्वी डब्यावरील सर्व सूचना लेबल क्लेम नुसार काळजीपूर्वक वाचाव्यात व पाळाव्यात.
  • सुरक्षित फवारणीसाठी योग्य साहित्य (हातमोजे, मास्क, चष्मा) वापरावा.
  • वापरण्यात येणारे पाणी स्वच्छ व योग्य pH असावे.

 

- प्रा. अजयकुमार सुगावे, किटकशास्त्र (पिक संरक्षण), कृषी विज्ञान केंद्र हिंगोली 

टॅग्स :सोयाबीनपीक व्यवस्थापनशेतीशेतकरी