Shet tale : शेततळ्यासाठी (Shet Tale) योग्य जागा निवडणे खूप महत्त्वाचे आहे. शेततळ्याची जागा निवडताना (choosing Lake site) काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे. योग्य जागा निवडल्यास शेततळे अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे शेततळ्यासाठी जागा निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात...
शेततळे जागा निवडीचे निकष१. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे खोदायचे किंवा तयार करावयाचे आहे, त्या शेतकऱ्यांचे जमीन धारण क्षेत्र, एकूण जमीन, घेतले जाणारी पिके याशिवाय उपजीविकेचे साधन, सिंचनाच्या सोई, सरासरी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, जमिनीचा प्रकार, जमिनीची साधारणतः खोली इत्यादी बाबीची माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे.२. जागा अशी निवडावी जेणेकरून कमीत कमी खोदकामामध्ये जास्तीत जास्त पाणीसाठा होईल. म्हणजेच, खड्ड्यातील जागा निवडावी. त्यामुळे कमी खर्चात जास्त पाणीसाठा होईल.३. शेततळ्यात पाणी साठविण्यासाठी शेततळ्यांच्या आकारमानाप्रमाणे धारणक्षेत्र उपलब्ध आहे कि नाही याची दक्षता घ्यावी.४. शेततळ्यास सुयोग्य सांडवा असावा जेणेकरून जास्तीचे पाणी शेततळ्यातून जमिनीची धूप न करता निघून जाईल.५. शेततळ्यात साठविलेल्या पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्याकरिता तळ्याच्या चारही बाजूस सुबाभूळ किंवा इतर झाडे लावावी, जेणेकरुन बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल.६. शेततळ्यात पाणी येण्यासाठी सुयोग्य आकाराचे पाणी प्रवेशद्वार असावे जेणेकरून कमी गाळाची माती शेततळ्यात येईल व शेततळे गाळाने भरणार नाही. शेततळ्यांच्या पाणी प्रवेशद्वारावर गाळ चाळण संयंत्र बसावे जेणेकरुन सोबत आलेला गाळ थांबविला जाईल व शेततळ्यात गाळ जमा होणार नाही.७. शेततळी तयार करण्याकरिता निवडलेली जागा रेताड किंवा मुरमाड असल्यास शेततळ्यास अस्तरीकरण करणे जरूरीचे असते. तसेच याबाबीचाही विचार करून जमिनीचा प्रकार, खोली व अस्तरीकरणाची आवश्यकता आहे की नाही याबाबात निश्चिती करावी.
- डॉ. किशोर घरडे, डॉ. यत्नेश बीसेन, डॉ. प्रशांत गावंडे, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.