Join us
Daily Top 2Weekly Top 5

Seed Germination Test : चमकदार बियाण्यांना फसू नका; पेरणीपूर्वी 'ही' टेस्ट कराच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:11 IST

Seed Germination Test : बदलत्या हवामानामुळे आणि निकृष्ट बियाण्यांच्या वाढत्या तक्रारींमुळे यंदा शेतकरी अधिक सावध झाले आहेत. पेरणीपूर्वी 'उगवण चाचणी' आणि बीजप्रक्रियेकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, घरच्या घरीच बियाण्यांची गुणवत्ता तपासली जात आहे. दुबार पेरणीचा धोका टाळण्यासाठी कृषी विभागानेही शेतकऱ्यांना उगवण टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे.(Seed Germination Test)

Seed Germination Test : पेरणीपूर्वी बियाण्यांचा आकार, रंग आणि चमक पाहून त्यांची गुणवत्ता ठरविण्याची पारंपरिक पद्धत आता बदलू लागली आहे. (Seed Germination Test)

बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि गेल्या काही वर्षांत दुबार पेरणीच्या वाढलेल्या घटनांमुळे शेतकरी अधिक सावध झाले आहेत. (Seed Germination Test)

विशेषतः सोयाबीन पट्ट्यात निकृष्ट उगवणक्षम बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात 'उगवण चाचणी' आणि 'बीज प्रक्रिया' याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.(Seed Germination Test)

गेल्या काही वर्षांत अनेक भागांत अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने पेरणी केली; मात्र शेतात कोंबच फुटले नाहीत. परिणामी दुबार पेरणी करावी लागली आणि खर्चात मोठी वाढ झाली. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते.(Seed Germination Test)

दिसायला चांगले म्हणजे उत्तम बियाणे नाही

पूर्वी बियाण्यांची निवड करताना शेतकरी दाण्यांचा आकार, चमक आणि रंग पाहून निर्णय घेत असत. मात्र कृषी तज्ज्ञांच्या मते, बाहेरून चमकदार दिसणारे दाणे आतून कमकुवत असू शकतात. चुकीची साठवणूक, जास्त ओलावा आणि तापमानातील बदलांमुळे बियाण्यांची उगवण क्षमता घटते.

यामुळे आता शेतकरी पेरणीपूर्वीच बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यावर भर देत आहेत. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे आणि काही प्रगतिशील शेतकरी घरच्या घरीच उगवण चाचणी करत आहेत.

घरच्या घरी अशी करा 'उगवण टेस्ट'

कृषी विभागाने शेतकऱ्यांना अत्यंत सोपी पद्धत सुचवली आहे. यासाठी कोणत्याही महागड्या उपकरणाची गरज नसते.

उगवण चाचणीची पद्धत  

१०० दाणे निवडा

ओल्या कापडात, टिश्यू पेपरमध्ये किंवा ट्रेमध्ये ठेवा

ओलावा कायम ठेवत ५ ते ७ दिवस प्रतीक्षा करा

सात दिवसांनी उगवलेले दाणे मोजा

जर ७० पेक्षा अधिक दाण्यांना कोंब फुटले, तर बियाणे योग्य समजले जाते. मात्र ७० पेक्षा कमी दाणे उगवले, तर त्या बियाण्याचा वापर धोकादायक ठरू शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

बीजप्रक्रियेवरही भर

यंदा केवळ उगवण चाचणीच नव्हे, तर बीजप्रक्रियेलाही विशेष महत्त्व मिळत आहे. बुरशीनाशक, जैविक प्रक्रिया आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रक्रिया केल्यास पिकाला सुरुवातीपासून चांगला जोम मिळतो.

बीजप्रक्रियेचे फायदे अनेक

सुरुवातीचा रोगप्रादुर्भाव कमी होतो

एकसमान उगवण होते

दुबार पेरणीचा धोका कमी होतो

पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते

उत्पादन खर्चात बचत होते

पिकाचा सुरुवातीपासून चांगला विकास होतो

कृषी अधिकाऱ्यांच्या मते, बदलत्या हवामानामुळे आता प्रत्येक पाऊस महत्त्वाचा ठरत आहे. अशा वेळी कमी उगवणक्षम बियाणे वापरल्यास संपूर्ण हंगाम धोक्यात येऊ शकतो.

हवामान बदलामुळे वाढली चिंता

हवामानातील अनिश्चितता, उशिरा होणारा पाऊस आणि अल्प कालावधीत होणारा मुसळधार पाऊस यामुळे खरीप नियोजन अधिकच आव्हानात्मक झाले आहे. पहिल्या पावसावरच पेरणीचे यश अवलंबून असल्याने शेतकरी कोणताही धोका पत्करू इच्छित नाहीत.

यामुळे 'उगवण तपासणी' ही आता पर्याय नसून खरीपपूर्व आवश्यक प्रक्रिया बनत चालली आहे. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यांचा वापर, योग्य साठवणूक आणि पेरणीपूर्व चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांमध्ये वाढते जागरूकता

पूर्वी फक्त व्यापाऱ्यांच्या विश्वासावर बियाणे खरेदी करणारे शेतकरी आता स्वतः चाचणी करून निर्णय घेत आहेत. यामुळे निकृष्ट बियाण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. खरीप हंगामाच्या तोंडावर ही वाढती जागरूकता शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बदल मानली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Cotton Farming Alert : कापूस शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी सरकारचे नवे नियोजन

अधिक वाचा : Kharif Season : कमी पावसामुळे पिकांचे नुकसान टाळायचे? कृषी विभागाने सांगितला फॉर्म्युला

English
हिंदी सारांश
Web Title : Seed Germination Test: Don't Be Fooled by Shiny Seeds; Test Before Sowing

Web Summary : Farmers are urged to test seed germination before sowing due to changing weather and past losses. Simple home tests can determine seed viability. Prioritizing seed treatment enhances crop health and reduces replanting risks, ensuring better yields.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसोयाबीन