Join us

Prakash Sapale : प्रकाश सापळा उभारणी कशी करायची? त्याचे फायदे काय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 20:48 IST

Prakash Sapale : थोडासा मान्सूनपुर्व  पाऊस (Pre Monsoon) झाल्यास शेताच्या बांधावर असलेल्या झाडांखाली प्रकाश सापळे लावणे गरजेचे असते.

Prakash Sapale : मंडळी थोडासा मान्सूनपुर्व  पाऊस (Pre Monsoon) झाला आणि लगेचच मिराताई आणि रामभाऊंची सगळी तयारी झाली शेताच्या बांधावर असलेल्या झाडांखाली प्रकाश सापळे (Prakash Sapale) लावण्याची. आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि या सापळ्यांचा काय संबंध आहे? याबाबत जाणून घेऊया... 

तर मंडळी रामभाऊ आणि मिराताईंच्या शेतात बांधावर कडुनिंब आणि बाभळीची झाडं आहेत. आणि दरवर्षी शेतात हुमणी अळी‌मुळे (Humi Ali)  पिक ऐन जोमात असतांनाच नुकसान होत. मग त्यांनी मला ही गोष्ट सांगितली, त्यावेळी त्यांना हुमणी अळीचा एकुण जिवनक्रम समजावून सांगितला.

एकात्मिक व्यवस्थापनात सर्वात सोपी असलेली हुमणी भुंगेरे नियंत्रण ही पद्धत लक्षात आणून दिली. ही पद्धत मिराताईंना एकुणच सर्वात सोपी वाटल्यामुळे त्यांनी लगेचच अवलंब करण्यास सुरुवात केली. 

प्रकाश सापळा उभारणी कशी करायची?शेताच्या बांधावर असणारे कडूनिंब आणि बाभळीची झाडे यांचा परीसर हुमणी भुंगेरे वास्तव्यास उत्तम परीसर असतो. वळवाचा पाऊस झाला की हे भुंगेरे जमीनितून बाहेर पडून या झाडांवर नर-मादी मिलनासाठी एकत्र येतात. हिच हे भुंगेरे नियंत्रणाची अचूक वेळ असते. यासाठी एका उंच सळईवर किंवा काठीवर (८ ते १० फूट उंचीची) पिवळा बल्ब किंवा LED दिवा लावावा. 

दिव्याच्या खाली पाण्याने भरलेली थाळी/टोप किंवा प्लास्टिकचे पातेले ठेवावे. त्या पाण्यात थोडं केरोसिन /डिटर्जंट टाकावे, जेणेकरून कीटक त्यात अडकून मरतील. दिवा संध्याकाळी सहा ते रात्री साडे दहा या वेळेत सुरू ठेवावा. नंतर रात्री उशिरा मित्र किटक त्यात अडकून मरतात त्यामुळे रात्री उशिरा दिवा बंद करावा. शेताच्या मध्यभागी किंवा उंचवट्यावर उभारावा. 

1 हेक्टरसाठी 1 प्रकाश सापळा पुरेसा असतो. मोठ्या क्षेत्रासाठी सापळ्यांची संख्या वाढवावी. हुमणी भुंग्यांचा प्रादुर्भाव मे ते जुलै महिन्यांदरम्यान अधिक असतो. पाऊस पडल्यानंतर दोन-तीन दिवसांनी संध्याकाळी दिवा लावावा. अशा पद्धतीने अवलंब केल्यास अत्यंत अल्प खर्चात आणि कमी कालावधीत आपण हुमणी अळीचे प्रभावी नियंत्रण करु शकतो.

आता उभारणी तर झाली, याचे फायदे काय? 

  • रासायनिक फवारणीची गरज कमी होते. भुंगेरे मोठ्या प्रमाणावर सापळ्यात अडकतात, त्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो.
  • जैवविविधतेला धक्का न लावता फक्त हानिकारक कीटकांचा नाश होतो.
  • रासायनिक फवारणीवर होणारा खर्च वाचतो
  • सापळ्यात अडकलेले कीटक पाहून प्रादुर्भावाचे स्वरूप कळते.
  • तर मग मंडळी तुम्ही पण करणार ना आपल्या शेतात प्रकाश सापळ्यांची उभारणी.

 

- श्रीमती सोनाली कदम, कृषी सहाय्यक, आडगाव चोथवा, येवला 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजनापीक व्यवस्थापनमोसमी पाऊस