नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य ((Social Welfare Department) विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा योजना राबविण्यात येते.
या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी 30 जून 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
या याजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर) खरेदी करण्यासाठी रूपये 3 लाख 50 हजार मर्यादेत 90 टक्के (कमाल रूपये 3 लाख 15 हजार) शासकीय अनुदान अनुज्ञेय आहे.
योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटांचे अध्यक्ष, सचिव व 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. योजनेच्या माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.