Maka Crop Management : महाराष्ट्रामध्ये अलीकडे रब्बी हंगामात मक्याचे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. सध्याचे ढगाळ हवामानामुळे मक्यावर काही किडींचा प्रादुर्भाव होतो तसेच रोगांचाही प्रादुर्भाव होतो. अशावेळी व्यवस्थापन कसे करावे, हे पाहुयात... मका पिकावर प्रामुख्याने खोडकीड, अमेरिकन लष्करी अळी व कणसे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. त्याचप्रमाणे मुळकुज, मर रोग तसेच टर्सिकम किंवा मेडिसपर्ण करपा या रोगांचाही प्रादुर्भाव होतो.
असे करा व्यवस्थापन
- खोडकिडीच्या नियंत्रणामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किंवा खोडकिडींची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी पिकांचे व इतर पर्यायी कीड वाढणाऱ्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत.
- तसेच सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे.
- त्याचप्रमाणे खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसताच डायमेथोएट ३० इसी, १.२ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
- अमेरिकन लष्कर अळीच्या सुरुवातीच्या अवस्थेत निमार्क १५०० पीपीएम, ५ मि.ली. प्रति लिटर पाणी किंवा निंबोळी अर्क ५% ची फवारणी करावी.
- त्याचप्रमाणे इमामेक्टिन बेंझोएट ५% एसजी, ८ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एसजी, ०.५ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
- दुसरी फवारणी १५ दिवसांनी करावी.
- कणसे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी एचएमपीव्ही २५० एलई तसेच ट्रायकोडर्मा चिलोनिस परोपजीवी अंडी असलेले ८ कार्ड प्रति हेक्टरी शेतात लावावेत.
टर्सीकम किंवा मेडिसपर्ण करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी
- मॅंकोझेब किंवा झायनेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
- त्याचप्रमाणे कार्बेंडेंझिम १२% + मॅन्कोझेब ६३% डब्ल्यूपी याचे एकत्रित मिश्रण, २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
- पिकावर मूळकुज किंवा मर रोग येवू नये म्हणून ट्रायकोडर्मा हरजीयानम २% डब्लूपी, २० ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात सुरुवातीलाच (पेरणीअगोदर) बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ