Agriculture News : दिवसेंदिवस शेतपिकासाठी लागणार खर्च हा वाढतच आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ. त्यातूनही शेतमाल पिकलाच तर हमीभाव मिळत नाही. वरील परिस्थिती बदलायची असेल तर शेतकरी बांधवांस शेतीमधील सर्व घटकांची सविस्तर शास्त्रीय माहिती देऊन शिक्षित करणे गरजेचे आहे.
यासाठी शेती बांधावरील प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावते. सूक्ष्मजीव आधारित खत आणि जैविक अर्क शेतातच कसे तयार करायचे याबद्दलचे प्रशिक्षण शेतकरी बांधवाना देण्यात येते. ट्रायकोडर्मा, मेटारायझियम किंवा इतर कोणत्याही मित्र सूक्ष्मजीवांवर आधारित नैसर्गिक खत आणि किटकनाशक उत्पादन.
शेतबांधावरील प्रयोगशाळेचे स्वरूप
- फॉस्फेट आणि पोटॅशियम विरघळणारे सूक्ष्मजीव आणि जैविक अर्क तयार करणे.
- धान्य-कडधान्य, सूक्ष्मजीव खाद्य आणि गूळ वापरून रोग आणि कीड प्रतिकारक्षमता विकसित करणारे सूक्ष्मजीव आणि जैविक अर्क उत्पादन तयार करणे.
- समुद्री तण आणि वनस्पती अर्क वापरून दाणेदार खत उत्पादन.
- धान्य-कडधान्य पीठ, समुद्री तण आणि वनस्पती अर्क वापरून बायोझाइम जेल तयार करणे.
- वनस्पती तेलावर आधारित नैसर्गिक किटकनाशके तयार करणे.
- शेणापासून नैसर्गिक खत तयार करणे.
- शेतातील काडीकचऱ्यापासून नैसर्गिक खत तयार करणे.
- साखर कारखाना किंवा दालमिल किंवा इतर कोणतेही उद्योग ज्यामधून नैसर्गिक उपउत्पादने निर्मिती होते त्यापासून नैसर्गिक खत तयार करणे.
- किचन वेस्ट किंवा हॉटेल वेस्टपासून नैसर्गिक खत तयार करणे.
अल्प खर्चात नैसर्गिक निविष्ठा तयार करणे व रोजगार निर्मितीसाठी शेतबांधावरील प्रयोगशाळेची सुरुवात एका छोट्या खोलीपासून झाली आणि आज एक छोटे परंतु टुमदार शेतकरी प्रशिक्षण केंद्र एरंडा वाशिम येथे महाराष्ट्र शासन, केंद्र शासन व काही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने उभारण्यात यश आले.
प्रशिक्षण केंद्राच्या मदतीने एरंडा, वाशिम या गावातील १० शेतकरी बांधव व त्यांच्या कुटुंबातील महिलांना रोजगार मिळाला आहे. शेतबांधावरील प्रयोगशाळेच्या माध्यमातून ४ कुटुंब महिन्याकाठी किमान ५० हजार रुपये उत्पन्न मिळवत आहेत आणि विशेषतः महाराष्ट्रात व इतर राज्यांमध्ये एकूण १३२ प्रयोगशाळा कार्यरत आहेत आणि किमान १५० शेतकरी बांधवांना शेती व्यतिरिक्त रोजगार उपलब्ध झाला आहे.
याव्यतिरिक्त खालील उपयोग होण्यास मदत मिळाली.
- शेतीला लागणाऱ्या निविष्ठांवरील खर्च ५० ते ७० टक्के कमी झाला.
- प्रत्येक पिकाची उत्पादकता १० ते ३० टक्के वाढवण्यात यश मिळाले.
- मातीचे आरोग्य सुधारण्यात यश मिळाले.
रासायनिक निविष्ठांचा वापर कमी झाल्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या सदस्यांना नैसर्गिक निविष्ठा निर्मिती हा रोजगाराचा पर्याय निर्माण झाला एरंडा, वाशिम येथील शेतबांधावरील प्रयोगशाळेच्या मदतीने ४ शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रत्येकी ६ लाख रुपये झाले आहे आणि तेही शेती उत्पन्नाच्या व्यतिरिक्त. प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न वाढावे यासाठी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत.
- संतोष चव्हाण आणि सहकारी फार्म लॅब एरंडा ऍग्री सोल्युशन्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, वाशिम, महाराष्ट्र
